आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Stops Becoming Clean; Over The Cleaning Compaing

बसस्थानके होणार चकाचक; महिनाभर स्वच्छता अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. ‘पैसे भरा व वापरा’ या तत्त्वावर देण्यात आलेल्या प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेविषयी प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत परिवहन महामंडळ 15 मे ते 15 जून दरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबवणार आहे.

ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाहिले जाते. मात्र, राज्यभरातील बहुतांश आगारांमध्ये अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. प्रसाधनगृहांची अवस्था वाईट असल्याने प्रवाशांचे हाल होतात. विशेषत: महिलांची कुचंबना होते. तुटलेले दरवाजे, नियमित जंतूनाशकांची फवारणी न होणे, पाण्याची कमतरता यामुळे प्रसाधनगृहांचा वापर करणार्‍यांना अक्षरक्ष: नाकाला रुमाल लावावा लागतो. प्रसाधनगृहांचा ठेका घेतलेल्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी होते. यासह प्रामुख्याने अस्वच्छतेबद्दल प्रवाशांनी परिवहन महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. यानुषंगाने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी 15 मे ते 15 जून दरम्यान एक महिन्याच्या कालावधीसाठी सर्व बसस्थानके, प्रसाधनगृहे आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी ‘विशेष स्वच्छता अभियाना’चे नियोजन केले आहे. स्वच्छता अभियानाच्या कार्यकाळात महामंडळाचे प्रादेशिक आणि विभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकारी बसस्थानकांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. हयगय करणार्‍यांवर कारवाई होईल.


हयगय केल्यास होईल कारवाई
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता, रंगरंगोटीला प्राधान्य असेल. महिला प्रवाशांना प्रसाधनगृहाचा वापर करतांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. अभियानात हयगय करणार्‍यांवर तातडीने कारवाई होईल.

अभियानानंतर स्वच्छतेसाठी दक्षता
अभियान कालावधीनंतरही बसस्थानके, प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रवाशांनी एसटीचे ‘विशेष स्वच्छता अभियान’ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. दीपक कपूर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

प्रवाशांच्या सोईसाठी योग्य निर्णय
भुसावळ बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात येईल. यामुळे महामंडळाच्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद मिळेल. ताराचंद पाटील, आगारप्रमुख, भुसावळ