आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय शिक्षणाच्या परीक्षेमध्ये गोंधळ, ५० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ओळखपत्राची झेरॉक्सप्रत सोबत आणली नसल्याच्या कारणावरून व्यवसाय शिक्षण संचालनालयातर्फे रविवारी झालेल्या परीक्षेत शहरातील केंद्रांवर ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.
खुबचंद सागरमल, काशिबाई कोल्हे विद्यालयासह विविध परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला. ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे आयटीआयच्या पेपरफुटीनंतर व्यवसाय शिक्षण विभागाच्या भरतीप्रक्रियेतील भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. परीक्षेपासून दूर ठेवलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य ९०० विद्यार्थी अनुपस्थित होते.

कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगार संचालनालयातर्फे रविवारी राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा झाली. शहरातील केंद्रांवर हजार ५७ विद्यार्थी प्रविष्ट होते. यातील सकाळ सत्रात १० ते ११.३० यावेळेत शिल्प निर्देशक, गणित निर्देशक, चित्रकला निर्देशक, भांडार अधीक्षक, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक लघुलेखक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी सकाळ सत्रात परीक्षा झाली. या वेळी २४३४ पैकी १७२३ विद्यार्थी परीक्षा दिली यात ७११ विद्यार्थी अनुपस्थित होते. दुपार सत्रात ते ३.३० या वेळेत शिपाई, चौकीदार सफाईगार पदासाठी परीक्षा झाली. यात ६४३ पैकी ४५४ विद्यार्थी हजर होते, तर १८९ विद्यार्थी अनुपस्थित होते.

खुबचंद सागरमल विद्यालयात केंद्रप्रमुख तहसीलदार पंकज लोखंडे यांनी ओळखपत्राची झेरॉक्सप्रत नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नसल्याची तक्रार २० ते २५ विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर ओळखपत्राच्या झेरॉक्सप्रतीची मागणी करण्यात आली. यावर विद्यार्थ्यांना तत्काळ झेरॉक्स करून आणा, असे सांगून बाहेर सोडण्यात आले. मात्र, परिसरात झेरॉक्सची दुकाने बंद असल्याने काही अंतर लांब जावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा विलंब लागला. याचे कारण पुढे करीत पर्यवेक्षकांनी मोहन ठाकूर (अमळनेर), भूषण इंगळे (जळगाव), विजय महाजन (पारोळा) यांच्यासह २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातच रोखले. शंभर गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न होते. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेसह प्रवेशपत्रही जमा करून घेण्यात आली.

कोल्हे विद्यालयात साक्षांकनासाठी भटकंती :काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयातही काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर साक्षांकन नव्हते. त्यामुळे त्यांनाही अटकाव करण्यात आला. त्यामुळे बाहेरून आलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांना बराचवेळ भटकावे लागले. प्रत्येक केंद्रावर मुख्याध्यापकांनी साक्षांकनासाठी उपस्थित राहणे आवश्यक असताना या शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्केही नसल्याचे सांगण्यात आले. अखेर १० वाजता वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले. दरम्यान, याच केंद्रावरील प्रशांत घुगे यास दोन विविध परीक्षा क्रमांक आल्याने घोळ दिसून आला; मात्र त्याने याच केंद्रावर परीक्षा दिली.

आयटीआयच्या प्राचार्यांनी जबाबदारी झटकली : परीक्षेपासूनवंचित ठेवल्याबद्दल आयटीआयचे प्राचार्य व्ही.एम.राजपूत यांना विचारले असता त्यांनी या परीक्षेशी आपला संबंध नसून आपण परीक्षा नियंत्रणाच्या कुठल्याही समितीत नाही. मला विचारू नका, असे सांगून जबाबदारी झटकली. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा घेण्यात आली. रथोत्सव सुटीचा दिवस असल्याने मात्र या परीक्षेकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

इंदूरहून निघालेल्या गाडीस उशीर झाल्यामुळे व्यवसाय शिक्षण संचलनालयाच्या परीक्षेसाठी आलेल्या महिलेस परीक्षेपासून वंचित रहावे लागले.