आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जाळून घेतले, १७ पानी सुसाइड नोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सावकारी जाचाला कंटाळून तब्बल १७ पानांची सुसाइड नोट लिहून बांभोरी येथील जय अंबे डिस्ट्रिब्युटरचे मालक अण्णासा वामनसा क्षत्रिय यांनी गुरुवारी अंगावर रसायन टाकून जाळून घेतले. चिठ्ठीत त्यांनी धुळे येथील माजी नगराध्यक्ष चंद्रासेठ गलाणींसह चार धुळ्याच्या, तर नाशिकच्या एका व्यक्तीचे नाव नमूद केले आहे. त्यांनी २००२ मध्ये गहाण ठेवलेल्या शेतीच्या वादातून आत्महत्या केली आहे.

क्षत्रिय यांचे जय अंबे डिस्ट्रिब्युटर नावाचे आइस्क्रीमचे गोडाऊन आहे. गुरुवारी ते बांभोरी येथील गोडाऊनमध्ये आले. त्यांनी एक गाडी भरून आइस्क्रीम पाठवले. त्यानंतर ते गोडाऊनमध्ये बसलेले होते. दुपारी वॉचमन अशोक नन्नवरे चहा पिण्यासाठी बांभोरी बसस्थानकावर गेले. त्यानंतर ते परत येत असताना त्यांना गोडाऊनमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तिथे जाऊन बघितले, तर गोडाऊनमध्ये क्षत्रिय आगीने होरपळून तडफड करत होते. क्षत्रिय यांनी दुपारी २.३० वाजेनंतर मुलगा सनी याचा मोबाइल घेतला नाही. त्यामुळे त्याला शंका आली. तो मामा रोहित दाणेज यांना घेऊन गोडाऊनकडे गेला. मात्र, तोपर्यंत क्षत्रिय यांची प्राणज्योत मालवली होती. १०० टक्के भाजून त्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता.
गेल्या तीन वर्षांपासून ते श्रीराम खटोड यांच्या पंचशील पेपर मिलच्या गोडाऊनमध्ये व्यवसाय करत होते. २००२ मध्ये त्यांनी शेती गहाण ठेवून धुळ्याच्या सावकारांकडून व्याजाचे पैसे घेतले होते. सध्या त्या जमिनीची किंमत एक कोटी रुपयांच्या वर आहे. मात्र, चंद्रासेठ गलाणी, दिलीप गलाणी, कैलास रामदास पाटील यांच्यासह गलाणी (पूर्ण नाव माहीत नाही) आणि नाशिक येथील एक व्यक्ती व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत होते. पैसे द्या, नाही तर काही तुटपुंजी रक्कम देऊन जमीन नावावर करून घेण्याच्या धमक्या देत होते. याचा उल्लेख क्षत्रिय यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे.
१७ पानी सुसाइड नोट
आत्महत्या करण्यापूर्वी क्षत्रिय यांनी त्यांच्या कंपनीच्या लेटरहेडवर लिहिले होते, "मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला गलाणींसह पाच जण जबाबदार आहेत. सविस्तर माहिती ड्रॉवर क्रमांक ३ मध्ये ठेवलेली आहे.' ड्रॉवरमध्ये १७ पानी सुसाइड नोट होती. त्यात सविस्तर माहिती होती.