आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण पाणीटंचाईत उद्योजक अन‌् व्यापारी करतात नि:स्वार्थ जलसेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्थळ - जळगाव रेल्वेस्थानक, वेळ- दुपारचे २ वाजलेले. प्रचंड उकाड्यात आणि प्रवाशांच्या खचाखच गर्दीने भरलेल्या स्थानकावर पाच वर्षांच्या बालकांपासून ५० ते ५५ वर्षांपर्यंतचे २५ स्वयंसेवक गाडीच्या प्रत्येक डब्यापुढे जाऊन पाण्याच्या बॉटल भरून देत होते. हे दृश्य काही एक दिवसाचे नाही. उन्हाळ्यातील तीन महिने दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ८ पर्यंत असे दृश्य पाहायला मिळते. येथे पाणीवाटप करणारे स्वयंसेवक काही साधारण व्यक्ती नसून कोणी उद्योजक आहेत तर कोणी व्यापारी. विशेष म्हणजे काही उद्योजक कुटुंबासह यात सहभागी होतात. गेल्या ५० वर्षांपासून ही नि:स्वार्थ जलसेवा सुरू आहे.

जळगावातील भीषण पाणीटंचाई, रेल्वेतील प्रवाशांना येणाऱ्या अडचणी पाहता स्थानकावरच पाणी देण्यासाठी सीताराम मणियार यांनी सिद्धिव्यंकटेश देवस्थानातर्फे सन १९६७ मध्ये फिरत्या पाणपोईला सुरुवात केली. त्यांचे पुत्र श्रीकांत मणियार यांनी ही सेवा अखंडित चालवली आहे. जळगावमध्ये त्यांची प्लास्टिक इंडस्ट्री आहे. त्याच्या शाखा इथिअाेपिया, व्हिएतनाम, मादागास्कर, माॅरिशस, टांझानिया, हैदराबाद येथे आहेत. ते पूर्ण कुटुंबासह या उपक्रमात सहभागी होतात. 

याशिवाय इंदिरा मणियार, डाॅ. कैलास मुंगड, कुसुम मुंगड, गणेश मंत्री, पद्मा मणियार, रेखा जानी, हितेश जानी, वंदना दहाड जलसेवा देतात. एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने न चुकता स्टेशनवर प्रवाशांना पाणी दिले जाते. सिद्धिव्यंकटेश देवस्थानाच्या माध्यमातून अनेक भाविकही या उपक्रमात सहभागी होतात. २५ स्वयंसेवक थंड पाण्याच्या टाक्या असलेल्या लोटगाड्या घेऊन एसी डबे वगळता प्रत्येक डब्याजवळ जाऊन बॉटल, वॉटरबॅगमध्ये पाणी देतात. रेल्वेस्टेशनवरच पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राेज ८०० किलाे बर्फ     
देवस्थानाच्या वतीने रेल्वेस्थानकावर दरराेज प्रवाशांना थंड पाणी पुरविण्यासाठी ७०० ते ८०० किलाे बर्फाची गरज भासते. ही सेवा अखंड राहावी म्हणून बर्फ कारखान्याकडून रोज बर्फ दिला जातो. 
बातम्या आणखी आहेत...