आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटिया शिशुगृहाची मान्यता रद्दसाठी अखेरची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आंबेडकर मार्केटमधील टाटिया शिशुगृहातून ‘कारा’च्या नियमांचा भंग करून अवैधरित्या बालके दत्तक देणे, पैसे घेणे आणि दोन मुले पळून गेल्याने महिला बालविकास आयुक्तांनी टाटिया शिशुगृहाला मान्यता रद्द केल्याची अंतिम नोटीस बजावली आहे.
टाटिया शिशुगृहातून ‘कारा’च्या नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या बाळ दत्तक दिले होते. त्याचबरोबर टाटिया शिशुगृहातून पाटील दाम्पत्याला बाळ दत्तक देण्यासाठी जालना येथील मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव विरेंद्र धोका यांनी तीन लाख रुपये मागितले होते. याबाबत कबुली देणारी आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपमधील संवाद ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करून भांडाफोड केला होता. या पार्श्वभूमीवर बालकल्याण समिती महिला बालविकास उपायुक्त बी.टी.पोखरकर यांच्याकडून टाटिया शिशुगृहाची वेगवेगळी तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये टाटिया शिशुगृहाचा अनागोंदी कारभार आढळून आला होता. याबाबतचा सविस्तर अहवाल महिला बालविकास आयुक्तांना सादर करण्यात आला होता. हे दोन्ही अहवाल सादर केल्यानंतर आयुक्तांनी टाटिया शिशुगृहाला मान्यता रद्द करण्याची प्राथमिक नोटीस देऊन खुलासा मागवला होता.

त्यानंतर महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर यांच्या विनंतीवरून ‘दिव्य मराठी’ने धोका यांची आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप दिली होती. काटकर यांनी ती ‘व्हिडिओ क्लिप’ आयुक्तांना सादर केली. या व्हिडिओ क्लिपद्वारे बालके दत्तक देण्यासाठी धोका तीन लाख रुपये घेत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तसेच खुलासा असमाधानकारक असल्याने आयुक्तांनी टाटिया शिशुगृहाला मान्यता रद्द करण्याची अंतिम नोटीस दिली आहे.

बालकल्याण समितीच्या निर्णयाला आव्हान
बालकल्याण समितीच्या आदेशानुसार टाटिया शिशुगृहातून पाटील दांपत्याला दत्तक दिलेल्या साई या बालकासह सहा बालके औरंगाबाद येथील शिशुगृह येथे तातडीने हलवण्यात आली होती. टाटिया शिशुगृहातून बालके हलवण्याच्या बालकल्याण समितीच्या निर्णयाला धोका यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याबाबत समितीकडून खुलासा मागवण्यात आला होता. नैसर्गिक न्यायतत्त्वाने बालकांना औरंगाबाद येथील शिशुगृहात हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व घटनाक्रमाबाबत समिती बालकल्याण अधिकाऱ्यांनी न्यायालयात खुलासा सादर केला आहे. औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल असलेल्या त्या सहा बालकांची तेथे जाऊन पाहणी केली असल्याचेही महिला बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...