आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोभी नवरदेवाला नवरीनेच दाखवला इंगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सव्वा लाख रुपये हुंडा घेतल्यानंतरही लोभी वरपक्षाने मुलाचा पगार वाढला म्हणून दोन लाख रुपये द्यावे, अशी मागणी ऐनवेळी लग्नाच्या मांडवात केली; मात्र लग्नासाठी मोठा खर्च केल्यानंतरही अचानक झालेल्या या मागणीने मुलीचे वडील हतबल झाले. दरम्यान, अनेकांनी मध्यस्थी व विनवण्या केल्यानंतरही आपला हेकटपणा कायम ठेवत नवरदेवासह वरपक्ष मांडवातच रुसून बसला. अखेर नवरीने हिंमत दाखवत लग्नालाच नकार दिला. याप्रकरणी रविवारी शहर पोलिस ठाण्यात वरासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील यश प्लाझा हॉलमध्ये गोरख ठाकरे यांच्या मुलीचे राजेंद्र रघुनाथ कदम याच्याशी रविवारी दुपारी लग्न होणार होते. राजेंद्र ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीस आहे. लग्न ठरल्यानंतर त्याचा पगार वाढला होता.

संमतीने ठरले लग्न
गुजराल पेट्रोलपंप भागातील रहिवासी व गेंदालाल मिल परिसरातील पान दुकानाचे मालक गोरख आनंदा ठाकरे यांच्या एकुलत्या मुलीचे लग्न खेडी येथील रघुनाथ काशिनाथ कदम यांचा मुलगा राजेंद्र याच्याशी जानेवारी महिन्यात ठरले. राजेंद्र वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीस आहे. मुलाकडील मंडळीने मुलीला पसंत केल्यानंतर पुढची बोलणी पक्की करण्यात आली व नातेवाइकांसमोर 1 लाख 31 हजार रुपये हुंडा देण्याचे ठरले. या वेळी मुलीचे काका निवृत्ती ठाकरे व हरीश ठाकरे यांनीदेखील त्याला संमती दिल्याने दोन्ही बाजूकडील मंडळींसमोर लग्नाची बोलणी पक्की करण्यात आली.

हळदीतच सुरू केल्या कुरबुरी
लग्न ठरल्याने मनोहर साडी सेंटरमध्ये बस्ता बांधला. तसेच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आर. एल. ज्वेलर्समध्ये करण्यात आली. त्यानंतर एकमेकांच्या घरी बस्ता पाहण्याचा कार्यक्रमदेखील ठरला. याच काळात मुलीचे आणि मुलाचे मोबाइलवरून संभाषण सुरू झाले. लग्नाची तारीख 2 जून निश्चित करून लग्न यश प्लाझामध्ये करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पत्रिका छापून त्यांचे वाटपही झाले. लग्नाची तारीख जवळ आली. शनिवारी, 1 जून रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने खेडी येथे मुलाच्या घरी मुलीकडील सर्व मंडळीने हजेरी लावली. रात्री यश प्लाझात भोजनाच्या कार्यक्रमाला मुलाकडील सर्व जण आले आणि तेथेच कुरबुरीची ठिणगी पडून 2 लाख रुपये हुंड्याची मागणी झाली.


जादा हुंडा दिला तरच येऊ मांडवात!
लग्नाची वेळ 12 वाजून 20 मिनिटांची असतानाही नवरदेव व नवरदेवाचे वर्‍हाड येत नसल्यामुळे मुलीच्या वडिलांनी त्यांना फोन करून येण्याची विनंती केली; मात्र त्यांनी लग्नाच्या मंडपात येण्यास नकार दिला. तसेच जोपर्यंत दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत आम्ही पारावरून हलणार नाही, अशी भूमिका घेऊन शाहूनगरातील मारुती मंदिराच्या पारावर बसून राहिले. मुलगी तयारी करून मांडवात उपस्थित होती, तर दुसरीकडे लग्नाच्या आधीच जेवणावळीदेखील सुरू झाल्या होत्या. पाहुणे मंडळी आलेली असताना त्यांच्यासमोरच लग्नाचा हा तमाशा सुरू होता. अनेक वेळा विनवण्या करूनही नवरदेवाकडील मंडळी ऐकण्यास तयार नव्हती. शेवटी विनवण्या करून व हात जोडून थकलेल्या मुलीच्या वडिलांनी शहर पोलिस ठाणे गाठून मुलाकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यादरम्यान मुलीकडील मंडळीच्या मागे मुलाकडील मंडळी व मुलाचे वडील हेदेखील शहर ठाण्यात पोहोचले.


मुलीच्या वडिलांनी केली विनवणी
लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाकडच्या मंडळीने कुरबुरी सुरू केल्या. मुलाचा पगार आता वाढला आहे. त्यामुळे त्याला दोन लाख रुपये हुंडा द्या, अशी मागणी मुलाच्या आई-वडिलांनी सुरू केली; मात्र वाढीव हुंडा देण्यास मुलीच्या वडिलांनी नकार दिला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाद सुरू होता; मात्र काही जणांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. तसेच पहाटे पाच वाजता मुलीकडील मंडळीने पुन्हा खेडी येथे जाऊन मुलाच्या वडिलांना लग्नास येण्याची विनंती केली.


मुलीचा स्वाभिमान
लग्नाच्या मांडवात सुरू असलेला गोंधळ व आपल्या वडिलांची होत असलेली फरपट पाहून मुलीनेही मग मलादेखील आता त्या मुलाशी लग्न करायचे नाही, असा निर्णय घेतला. आताच तो मला इतका त्रास देत आहे, तर भविष्यात किती देईल! असे म्हणत स्वाभिमानी मुलीने लग्नास नकार दिला.


नवरदेव पारावरच
एकीकडे लग्नाच्या मांडवात गोंधळ सुरू होता, तर दुसरीकडे नवरदेव मात्र पारावरच बसून होता. बराच वेळानंतर त्याने नकाराला होकारात बदलवत आमची लग्नास तयारी आहे, अशी भूमिका घेतली; मात्र मुलीकडच्या मंडळीचा त्याच्यावरील विश्वास उडाल्याने अखेर हे लग्न मोडण्यात आले.