आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तगत सोने आयजीच्या हस्ते परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घरफोडी, दरोडे, सोनसाखळी ओढून पळविलेले सुमारे 134.02 ग्रॅम सोने आणि 3 लाखांचा ऐवज पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांकडून हस्तगत केला. हा ऐवज संबंधित 18 जणांना पोलिस दलातर्फे शनिवारी सायंकाळी 4 वाजता मंगलम हॉल येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते परत करण्यात आला.
पोलिसांनी काही महिन्यात सराईत गुन्हेगार, चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली देत चोरलेला ऐवज काढून दिला. चोरट्यांकडून संपूर्ण माहिती घेऊन ज्यांच्या घरी चोरी, किंवा महिलांची सोनसाखळी पळवली आहे, अशा पीडितांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना त्यांचा ऐवज पोलिसांनी शनिवारी परत केला. यात एमआयडीसी, शहर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील सोने होते तर अमळनेर येथील महाजन यांच्या घरात चोरी झाली होती. यातील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. महाजन यांच्या घरातून 3 लाखांचा ऐवज लंपास केला होता. तो संपूर्ण ऐवज त्यांना परत केला.
या वेळी साळुंखे यांनी किरकोळ कारणांहून एकमेकांशी लढण्यापेक्षा परिसराचा विकास करण्यासाठी एकत्र या. जगभरात फक्त भारतातच अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे ही एकत्रितता अबाधित ठेवा.
अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका, उप अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक तेजस्विनी सातपुते, जनार्दन महाराज, विश्वनाथ जोशी, फादर सिजो जॉन, भदंत सुमंत तीस्त, हानिफ शाह बापू, मौलाना अख्तर, गुरप्रीतसिंग आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दहा पोलिस पाटलांना ओळखपत्र देण्यात आले.