आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभ्या ट्रॅक्टरवर धडकली कार; एक ठार तर दुसरा जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एमआयडीसीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बंद पडलेल्या ट्रॅक्टरची दुरुस्ती करीत असताना भरधाव असणार्‍या होंडा सिटी कारने सुरुवातीला कारागिराला व नंतर ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन मार्केटच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; परंतु यात ट्रॅक्टर दुरुस्त करणारे कारागीर नारायण दशरथ चौधरी (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालकास अटक करण्यात आली आहे.
ऑटोनगर परिसरात नारायण चौधरी यांचे गॅरेज आहे. सोमवारी रात्री ते रमेश यादव या सहकार्‍यासह बाजार समितीच्या गेटसमोर ट्रॅक्टर दुरुस्त करीत होते. या वेळी औरंगाबादकडून जळगावकडे येत असताना मधुसुदन माणिक भट्टल (रा.अजय कॉलनी, रिंगरोड) हे होंडा सिटी कारने (क्र.एमएच-19/एपी-4030) सुरूवातीला कारागीरला व नंतर ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर सुरू होऊन ते मार्केटच्या भिंतीवर आदळले. यात नारायण चौधरी यांचा मृत्यू झाला तर रमेश यादव जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल भगीरथ नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भट्टलविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम 304 अ, 279 व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरींची घरची परिस्थिती जेमतेम
चौधरी हे मॅकेनिक होते. गॅरेजमधून मिळणार्‍या जेमतेम उत्पन्नातून त्यांनी चार मुलींची लग्न केलीत. त्यांच्या एका मुलीचे लग्न अद्यापही झालेले नाही, तर मुलगाही अविवाहित आहे. आयुष्यभर राब-राब राबून परिवाराचा गाडा ओढणार्‍या चौधरी यांच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला गेला आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुग्णालयात गर्दी : कारचालक भट्टल याने चौधरी यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. त्याने डॉक्टरांना डोक्याला मार लागल्याचे सांगितले.
यानंतर तो स्वत: पांडे चौकातील सर्मथ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. मंगळवारी सकाळी 8 वाजता तुकारामवाडी परिसरातील नागरिकांनी सर्मथ हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन भट्टलला अटक केल्याशिवाय चौधरी यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, जमावाने काहीही ऐकून न घेण्याचा पवित्रा घेतल्यामुळे अखेर भट्टलला मागील दरवाजाने हॉस्पिटलबाहेर काढून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.