आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ तीन माथेफिरूंच्या आणखी दोन चित्रफिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात आठ कारच्या काचा फाेडणाऱ्या तिघा माथेफिरूंचे आणखी दाेन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज गुरुवारी प्राप्त झाले. त्यातदेखील तिघे काच फाेडताना स्पष्ट दिसत आहेत. या फुटेजवरून तिघांची आेळख थाेडी फार पटत आहे. त्यामुळे या फुटेजवरून तिघांना पकडणे आता पाेलिसांना साेपे हाेणार आहे.

मू.जे.महाविद्यालय परिसरातील जयनगर गुलमोहर कॉलनी या भागात तीन माथेफिरूंनी बुधवारी पहाटे आठ कारच्या काचा फोडल्या होत्या. हे माथेफिरू तीन ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यापैकी प्रकाश वाणी यांच्या दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज बुधवारीच तपासण्यात आले. त्यात तिघेही त्यांच्या कारच्या काचा फाेडताना िदसत आहेत. त्यानंतर गुरुवारी ओंकारेश्वर मंदिर आणि वसंतस् सुपर शॉपचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यातही हे तिघे स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून त्यांची ओळख पटणार असल्याचा दावा काही जणांनी केला आहे. त्यामुळे आता या माथेफिरूंना पकडणे सोपे हाेणार आहे. तसेच पकडल्यानंतर त्यांचा असे करण्यामागचा नेमका उद्देश काय हाेता? हेही स्पष्ट येणार आहे. दरम्यान, तिघांनी फाेडलेल्या दोन कारची किंमत १० लाखांपेक्षा जास्त आहे. या गाड्यांच्या काचा जळगावात उपलब्ध होत नसल्यामुळे संबंधितांना आता औरंगाबाद वा पुण्याला जाऊन त्या विकत घ्याव्या लागणार आहेत.

तीन फुटेज, तीन अँगल
कॅमेरा1: प्रकाशवाणी यांच्या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात माथेफिरू रॉयल पॅलेसकडून पुढे येत वाणींच्या दुकानाबाहेर उभ्या कारची ड्रायव्हर साइडची काच लाकडी दांड्याने फोडताना दिसत आहेत. त्यात ते तीन जण असल्याचे लक्षात येते.

कॅमेरा2: वाणींच्या दुकानापासून १०० मीटर अंतरावर ओंकारेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या तीन दिशांना सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यात तिघांचे साइड अँगल दिसत आहेत. यात काचा फोडणारे माथेफिरू दिसतात. परंतु, पाहिजे तेवढे स्पष्ट दिसत नाहीत.

कॅमेरा3: वसंत सुपर शॉपच्या बाहेरील हाय रेझ्युलेशन कॅमेऱ्यात हे माथेफिरू स्पष्ट दिसत आहेत. त्यांची दुचाकीही ओळखता येते. त्यामुळे पाेलिसांनी या गाेष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यास माथेफिरूंपर्यंत सहज पाेहाेचता येईल.

सधन कुटुंबातील मुले
परिसरातील एका व्यापाऱ्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून या मुलांची पुसटशी ओळख पटवली आहे. तिघांनी वापरलेली दुचाकी अ‍ॅव्हेंजर कंपनीची असल्याचे दिसून येत आहे. तसेच ही मुले याच परिसरात राहणाऱ्या सधन कुटुंबांमधील असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. या टवाळखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना भेटून सीसीटीव्ही फुटेज देण्याचा निर्णय घेतला आहे.