आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Car Monogram Found At Bhusawal 12 Robber Student Arrested At Bhusawal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात ‘मोनोग्राम’ चोरट्यांचा पर्दाफाश; 12 अल्पवयीन विद्यार्थी ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात चारचाकी वाहनांचे ‘मोनोग्राम’ चोरणार्‍या विद्यार्थ्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. चौकशीसाठी बाजारपेठ पोलिसांनी 12 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल तीन लाख रुपये किमतीचे 130 ‘मोनोग्राम’ जप्त करण्यात आले आहेत.

शहरातील मोकळ्या जागेत लावलेल्या महागड्या गाड्यांचे मोनोग्राम चोरीचे प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. वाहनमालकांनी याबाबत अनेकवेळा पोलिसांना कल्पनाही दिली होती. तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी मोनोग्राम चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी काही दिवसांपासून मोहीम उघडली होती. एका विद्यार्थ्याने महागड्या वाहनाचा मोनोग्राम चोरल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यावर संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांनी रविवार चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने सोबतच्या 11 साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. मोनोग्राम चोरी करणार्‍या विद्यार्थ्यांची नावे, गावे, शाळा, इयत्ता, कधीपासून चोरी करताहेत, कोणाला विकले, किती रुपयात विकले, याबाबत माहिती संकलित करण्याचे काम डीबी पथकाचे कर्मचारी सहायक फौजदार लक्ष्मण पवार, राजू साळुंके, शरिफ काझी, प्रमोद पाटील, संजय पाटील संजय खंडारे, दीपक शिरसाठ, सुधीर विसपुते, बंटी सैंदाणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.


महागडे ‘मोनोग्राम’
स्कोडा, होंडा सीटी, महेंद्रा, बीएमडब्ल्यू, होंडा टोयाटो, फियाट, मारुती कार, अल्टो, व्हॅगनार, फोर्ट अशा महागड्या गाड्यांचे तब्बल 130 मोनोग्राम पोलिसांनी या विद्यार्थ्यांकडून जप्त केले आहेत. 500 ते 30 हजार रुपये अशी एका मोनोग्रामची किंमत आहे. बीएमडब्ल्यू गाडीचा एक मोनोग्राम 30 हजार रुपये किमतीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहावीचा विद्यार्थी म्होरक्या
दहावीच्या वर्गातील एक विद्यार्थी या टोळीचा म्होरक्या आहे. शहरातील काही भंगार विक्रेत्या विद्यार्थ्यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
-प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, बाजारपेठ पोलिस स्टेशन

तक्रारदारांनी आता यावे पुढे
शहरातील ज्या वाहनांचे मोनोग्राम चोरीला गेले आहेत, अशा वाहनांच्या मालकांनी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे यावे. चोरीच्या कामासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणारा दुसरा कुणी सूत्रधार आहे का? याचाही कसून शोध सुरू आहे.
-विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक, भुसावळ

उच्चभ्रू मुलांचा समावेश
मोनोग्राम चोरणार्‍या टोळीत शहरातील उच्च्भ्रू कुटुंबातील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी रविवारी सकाळीच या विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविले. आपला मुलगा शाळेतून घरी आल्यावर कधी दप्तराची तपासणी केली का ? अशी विचारणाही त्यांनी केली. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले सर्व 12 विद्यार्थी हे अल्पवयीन आहेत. त्यांच्यापैकी तीन विद्यार्थ्यांना बालसुधारगृहात रवाना केले जाणार आहे.