आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार संजय सावकारेंच्या गाडीचा ‘मोनोग्राम’ही लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात चारचाकी वाहनांचे ‘मोनोग्राम’ चोरणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या टोळीचा रविवारी पर्दाफाश झाला आहे. बाजारपेठ पोलिसांनी या टोळीकडून तीन लाख रुपये किमतीचे 130 मोनोग्राम जप्त केले आहेत. त्यानंतर सोमवारी 40 वाहनधारकांनी आपल्या वाहनांचे मोनोग्राम लंपास झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला. आमदार संजय सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या वाहनांचेही मोनोग्राम लंपास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोनोग्राम चोरीप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पाचवी ते दहावीच्या वर्गातील 11 विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे जाबजबाब घेऊन त्यांना सोडून दिले. मात्र, त्यांच्याकडून हे काम करून घेणारा दहावीच्या वर्गातील एक मास्टरमाइंड विद्यार्थ्याची चौकशी करून त्याची जळगावच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी शहरातील वाहनांची दुरुस्ती करणार्‍या एका व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून मोनोग्राम चोरीचे काम करण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखविणारा मास्टरमाइंड दुसराच असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुशंगाने बाजारपेठ पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवली आहेत.

भंगार विक्रेत्यांचीही चौकशी झाली सुरू
महागड्या वाहनांचे मोनोग्राम चोरी केलेल्या विद्यार्थ्यांनी मॅकेनिकल, भंगार विक्रेते यांना विकल्याची कबुली दिली आहे. त्यातून मिळालेल्या पैशांतून चंगळ केल्याचेही या बाळबोध विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांत 10 भंगार विक्रेत्यांची चौकशी पोलिसांनी केली आहे.

बड्यांना फटका
मोनोग्राम चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर वाहने घेऊन अनेकांनी सोमवारी सकाळीच बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार संजय सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, गोपाळ मंत्री यांच्यासह उद्योजकांच्या वाहनांचेही मोनोग्राम लंपास झाल्याचे उघड झाले आहे.

मास्टर माइंडचा शोध सुरू
अल्पवयीन विद्यार्थ्यांना मोनोग्राम चोरीसाठी प्रवृत्त करणारा मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे. भंगार विक्रेते, वाहनदुरुस्ती करणारे आदींची चौकशी सुरू आहे. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांनाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
-प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, बाजारपेठ पोलिस ठाणे

पालकांनी सजग राहावे
आपला पाल्य शाळेतून घरी आल्यावर त्याचे शालेय दप्तर तपासणी केली पाहिजे. तो वेळेवर शाळेत जातो व येतो का? याची शहानिशा करण्यासाठी वेळोवेळी शाळांना भेटी दिल्या पाहिजेत. पालकांचा पाल्यांशी सुसंवाद असला तरच अशाप्रकारची नामुष्की कोणावरच येणार नाही.
-जी.एम.महाजन, माजी मुख्याध्यापक, के. नारखेडे