आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी हमालबांधवांचे कामबंद आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वे मालधक्कय़ावर काम करणार्‍या हमालबांधवांसाठी रेल्वेने पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेकडून मागणी केली जात होती. मात्र, या मागणीकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने संतापलेल्या सुमारे 800 हमालबांधवांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, दुपारी 4 वाजता रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या दोन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे व लवकरच कायमस्वरुपी सिमेंटची टाकी बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हमालांनी पुन्हा कामास सुरुवात केली. अचानक बंद पुकारल्यामुळे मालधक्कय़ावर 1 हजार 600 टन खते पडून तर सिमेंटने भरलेली संपूर्ण मालगाडी उभी आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी अनेक आंदोलने
दिवसभर काम करणार्‍या रेल्वे मालधक्कय़ावरील हमालांसाठी रेल्वेने पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने दिली, यानंतर थातूरमातूर सोय करण्यात आली. तीदेखील कुचकामी असून यावर कायमस्वरुपी उपचार हवे, अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे रेल्वेचे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठकही झाली होती, यात पाण्याची सुविधा करून देण्याचे आश्वासनही रेल्वे अधिकार्‍यांनी दिले. मात्र, ते अद्यापही पाळले गेले नाही. त्यामुळेच हमालांनी सकाळी 8 वाजेपासून आंदोलन पुकारले होते. रेल्वे प्रशासनाने दुपारी 4 वाजता हमाल संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलावून मालधक्क्यावर तात्पुरत्या दोन पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्याचे तसेच लवकरच कायमस्वरुपी सिमेंटची टाकी बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर हमालांनी कामास सुरुवात केली. बैठकीला रेल्वेचे सहायक वाणिज्य अधिकारी श्याम कुळकर्णी, आर.बी.पाटील, संघटनेचे जलाल्लोद्दीन चिरोगोद्दीन, मुकेश जाधव, पंडित नाईक, राजू पटेल उपस्थित होते.