जळगाव - बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरुद्ध दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मंगळवारी मागे घेतला.
सन २००३ मध्ये मंत्री असताना जैन यांना लाल दिव्याची गाडी होती. त्या वेळी हजारे यांनी ‘लाल दिव्याच्या गाडीतले दरोडेखोर’ असे वक्तव्य जैन यांच्याबाबत केले होते. हजारेंच्या या वक्तव्यावरून वृत्तपत्रांत तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे जैन यांनी हजारेंविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
१२ वर्षांपासून हा खटला न्यायालयात सुरू होता. गेल्या दोन महिन्यांपासून खटल्याच्या कामकाजाला गती आली होती. त्यात जैन यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना जळगावात हजर राहण्याचा अर्ज हजारेंच्या वकिलांनी केला होता. मात्र, प्रकृती खराब असल्यामुळे जैन हजर राहू शकत नाहीत, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. चार वर्षांपूर्वी जैन यांचा जबाब झाला होता. मात्र, तो अर्धवट असल्यामुळे कामकाज पुढे सरकले नव्हते. अखेर मंगळवारी जैन यांनी अॅड. पंकज अत्रे यांच्यातर्फे अर्ज दाखल करून खटला मागे घेण्याची विनंती न्यायालयात केली. त्यावर न्यायाधीश ए. डी. बोस यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.