आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी चार हजार पडताळणी प्रमाणपत्रे वाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासनाने सर्व मागासवर्गीय शासकीय कर्मचार्‍यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथील विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रमाणपत्रासाठी अनेक प्रकरणे सादर झाली होती. त्यातील 14 हजार 100 प्रकरणे पात्र ठरली असून, प्रमाणपत्र वाटपास शहरातील कल्याण भवनात शनिवारपासून प्रारंभ झाला.

येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयात जून व जुलै महिन्यात शासकीय कर्मचार्‍यांनी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी मोठय़ा प्रमाणावर प्रकरणे दाखल केली होती. त्यातील 14 हजार 100 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यानुसार शनिवारपासून येथील कल्याण भवनात पात्र प्रकरणांच्या वाटपास प्रारंभ झाला. या वेळी विभागीय समितीचे अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, सदस्य सचिव राकेश पाटील, सदस्य अरविंद वळवी, जनसंपर्क अधिकारी विनोद जोशी आदी उपस्थित होते.

प्रमाणपत्र वाटपासाठी दहा खिडक्या सुरू करण्यात आल्या असून, 36 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी दिवसभरात तीन ते चार हजार प्रमाणपत्रांचे वाटप झाले. प्रमाणपत्र घेण्यासाठी सकाळपासून कल्याण भवनात रांगा लागल्या होत्या. प्रमाणपत्र वाटपावेळी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आज सायंकाळपर्यंत होणार वितरण
धुळे, जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्‍यांना प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. पात्र प्रकरणांची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रमाणपत्र घेण्यासाठी कर्मचार्‍यांनी ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर जी प्रकरणे जून, जुलै महिन्यात दाखल झालेली आहेत. मात्र, अद्याप निकाली निघालेली नाहीत, अशी प्रकरणे 26 जानेवारीनंतर निकाली काढण्यात येणार आहेत.

सुटीच्या दिवशीही वितरण
शासकीय कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवसात प्रकरण वितरणासाठी शिबिर घेण्यात येत आहे. तिन्ही जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी याचा लाभ घ्यावा. प्रमाणपत्र घेण्यासाठी कर्मचार्‍यांनी स्वत: उपस्थित राहावे.वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. राकेश पाटील, सदस्य सचिव विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समिती