आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मार्चपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार- महासंचालक अनिल शर्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे आणि भुसावळ या पाच विभागांत रेल्वे सुरक्षा दलामध्ये 1 हजार 450 जागा रिक्त आहेत. मात्र, या जागा रिक्त असल्या तरी सध्या सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. यासाठी भविष्यात होमगार्डची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अनिल शर्मा यांनी दिली. वार्षिक निरीक्षणासाठी ते शनिवारी सकाळी भुसावळात आले होते. त्यांनी ‘दिव्य मराठी’ला विशेष मुलाखत दिली. त्यांची उत्तरे त्यांच्याच शब्दांत.

प्रश्न : धावत्या रेल्वेतील वाढत्या चोर्‍या, महिला प्रवाशांना टारगटांकडून होणारे त्रास थांबवण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
उत्तर : लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांनी कारवाईची संयुक्त मोहीम अलीकडेच हाती घेतली आहे. धावत्या रेल्वेगाड्यांचेही सर्वेक्षण त्या अनुषंगाने पूर्ण झाले आहे.

प्रश्न : रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कधीपर्यंत बसवण्याचे काम पूर्ण होईल? सध्याचे काय प्रयत्न सुरू आहेत?
उत्तर : मध्य रेल्वेच्या पाचही विभागात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वेच्या सरव्यवस्थापकांकडे तसा प्रस्ताव दिला आहे. मार्च 2014 पर्यंत हे काम पूर्ण होईल.

प्रश्न : रेल्वे सुरक्षा बलातील रिक्त जागा भरण्यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत काय? असतील तर ते नेमके काय आहेत?
उत्तर : उपनिरीक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया झाली आहे. जून ते जुलै 2014 पर्यंत ते नियुक्त होतील. सध्या त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तोपर्यंत होमगार्डची मदत घेऊ.

प्रश्न : भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीला आणखी किती होमगार्ड वाढवून मदत घेतली जाणार आहे?
उत्तर : भुसावळ विभागात सध्या रेल्वे सुरक्षा बल 27 होमगार्डची मदत घेत आहे. आगामी काळात ही संख्या 70 च्या जवळपास जाईल. मुंबई विभागासाठी 350 होमगार्ड्सची मागणी आहे.

धावत्या रेल्वेत गस्त सक्तची
> रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून धावत्या गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना गस्त सक्तीची केली आहे.
> भुसावळ स्थानकावर नव्याने अत्याधुनिक 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव रेल्वे सरव्यवस्थापकांकडे पाठवला आहे.
> स्थानकावर पूर्वी बसवलेले मॉनिटर 17 इंची आहेत. नवीन मॉनिटर 42 इंची असतील. त्यात सर्व फुटेज स्पष्टपणे दिसेल.
> भुसावळ विभागातील मोठय़ा पाच रेल्वेस्थानकांवर 101 कॅमेरे सध्या आहेत.