आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात घराचे छत कोसळून चौघांचा मृत्यू; मृतांत आई, वडिलांसह, दोन लहान मुलांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा (जि. जळगाव)- शहरातील रामचौक भागातील भोईगल्लीत राहणाऱ्या मेथे कुटुंबातील चौघांच्या अंगावर मंगळवारी पहाटे घराचे छत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडिलांसह दोघा मुलांचा समावेश आहे. या चौघांवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान भिकाजी मेथे (वय ६०) हे टायर पंक्चर काढण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पहिली पत्नी वारल्याने त्यांनी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना पाच मुली असून त्यांचे सर्वांची लग्न झालेले आहेत. तर दुसरी पत्नी लक्ष्मीबाई (वय ५०) हिच्यापासून हरीश (वय ११) व विजय (वय ७) ही दोन मुले झाले होती. हे कुटुंब एका छोट्याशा घरात राहत होते. भगवान मेथे, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे आपल्या मुलांसह घराच्या पुढील भागात झोपले होते. मंगळवारी पहाटे ४ वाजेदरम्यान जीर्ण झालेल्या मातीच्या घराचे छत कोसळले व त्याखाली दबून चौघांचा मृत्यू झाला.

भगवान मेथे यांच्या दरवाजाबाहेर पडदा लावलेला असल्याने व छत कोसळल्याचा आवाज न आल्याने सकाळी ६ वाजेपर्यंत या घटनेची माहिती शेजाऱ्यांनाही नव्हती. सकाळी दूधवाला आला आणि त्याच्या आवाजाला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजाऱ्यांकडे शंका व्यक्त केली.
या सर्वांनी दरवाजाचा पडदा बाजूला करून घरात बघितले असता मेथे कुटुंबीय मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले होते. या मंडळींनी माती बाजूला करीत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, लक्ष्मीबाई वाचू शकतात, असे वाटले. त्यांना त्वरित सर्वांना एका रुग्णालयात नेले, परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सत्संगामुळे महिला बचावली
भगवान मेथे यांच्या आई हिराबाई या सावखेडा होळ येथील इंद्रपाल महाराजांच्या आश्रमातील सत्संगाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. या कार्यक्रमास उशीर झाल्याने त्या आश्रमातच मुक्कामी राहिल्याने त्या बचावल्या.