आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया! आता बारावीनंतर प्रवेशासाठी होईल परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्रथम वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठस्तरावर समिती गठित करून कुठल्या शाखांसाठी हा बदल करायचा ते ठरवण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे येत्या आठ दिवसांत ही समिती गठित केली जाईल. यासंदर्भात कुलपती कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.

शासकीय कामे पेपरलेस व्हावी, तसेच डिजिटलायझेशन करण्याच्या उद्देशाने शासनाने शिक्षण क्षेत्रात हा बदल सुचवला आहे. आतापर्यंत वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा देण्याची गरज नव्हती. केवळ काही व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्रवेशपूर्व परीक्षेची सक्ती होती. इतर अभ्यासक्रमांसाठी मात्र ऑफ लाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आता नव्याने होणारा बदल चांगला असला तरी, महाविद्यालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणाराही असू शकतो. कारण या नवीन पद्धतीत प्रवेशपूर्व परीक्षा घ्यावी लागणार आहे. यात विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटण्याचे चिन्ह आहे. या नवीन बदलांनुसार अल्पसंख्याक दर्जा असणाऱ्या संस्थांच्या ५० टक्के जागा केंद्रीय पद्धतीने भरल्या जातील. विद्यार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने प्रवेश मिळतील, प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा शासनाची आहे.

या अडचणी येऊ शकतात
अॉनलाइन पद्धतीमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. खान्देशात काही भाग आदिवासी दुर्गम अाहे. नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असल्यामुळे एकाच वेळी वापर झाल्यास सर्वर डाऊन, संकेतस्थळ उघडण्यास विलंब यासारख्या अडचणी समोर येण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया किचकट वाटल्यास काही मुले प्रवेश घेण्याचेही टाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बदलाकडे सकारात्मकतेने पहावे
उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी असे बदल आवश्यक आहे. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेण्याआधी प्रवेश परीक्षा झाल्यास विद्यार्थी त्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करतील. विद्यार्थ्यांनी देखील या बदलाकडे सकारात्मकपणे पहायला पाहिजे. डॉ. एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

अशी असेल पद्धत
कोणत्याहीशाखेत पहिल्या वर्षासाठी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बदल असेल. आतापर्यंत वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये थेट प्रवेश दिले जात होते. आता प्रवेशासाठी विद्यापीठांतर्गत परीक्षा घेतली जाईल. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या तसेच विद्यापीठांच्या संकेतस्थळावरून परीक्षेसंदर्भात माहिती पुरवली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर युजर आयडी, पासवर्ड तसेच हॉल तिकीट दिले जाईल. त्यानुसार परीक्षा होईल. मात्र, परीक्षा किती गुणांची असेल? त्यात कोणते प्रश्न असतील? याबाबतीत समितीच निर्णय घेणार आहे.

यंदापासून अंमल
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही असे बदल करण्यात येतील. केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यासाठी समिती गठित केली जाईल. यंदापासून सर्वच शाखांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येईल. -प्रा.डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरू