आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्ट्रल बँकेची कर्जासाठी स्वतंत्र शाखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कर्जासाठी बँकेत होणार्‍या गर्दीचा नियमित कामावर परिणाम होऊ नये, कर्ज घेणार्‍या ग्राहकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने स्वतंत्र ‘रिटेल अँसेट’ शाखा सुरू केली आहे. ग्राहकांची कर्ज प्रकरणे या शाखेत मंजूर होणार असून रहिवासी असलेल्या भागातील शाखेतून कर्जाचे वितरण होणार आहे. ग्राहकांना खाते उघडता येत असले तरी या शाखेत रोखीचे व्यवहार करता येणार नाहीत.

सेन्ट्रल बँकेकडून कर्ज घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना सध्याच्या कोणत्याही शाखेशिवाय रिटेल अँसेट शाखेत कर्जाची मागणी करता येईल. वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्जाचे अर्ज या शाखेत स्वीकारले जातील. स्वतंत्र शाखा असल्यामुळे ग्राहकांना कर्ज प्रकरणे लवकर मंजूर केली जातील. सेन्ट्रल बँकेत सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्वतंत्र कर्जासाठी असलेली जिल्ह्यातील ही पहिलीच शाखा ठरणार आहे. आदर्शनगर रस्त्यावर ही शाखा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी नागपूर मंडळाचे अधिकारी सीताराम खाटीक, क्षेत्रीय प्रबंधक वास्ती व्यंकटेश उपस्थित राहणार आहेत. 17 जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली असून गुरुवारी त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरित करणार असल्याचे बँकेचे व्यवस्थापक दिलीप निकम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

ग्राहकांना हा होईल फायदा
बहुतांश बँकांमध्ये कर्ज खाते विभाग असतो. बँकांमध्ये कर्ज घेण्यास गेले असताना संबंधित कर्मचारी नसल्यास माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे काम लांबते. ही शाखा स्वतंत्रपणे कर्जाचीच असल्याने कर्जविषयक प्रकरण लवकर निकाली निघतील.