आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल, महात्मा फुले मार्केट आगीच्या तोंडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल फुले मार्केटच्या वायरिंग रूममध्येही सारख्या शॉर्टसर्किटच्या घटना घडतात. या मार्केटनजीकच्या विद्युत रोहित्रावरदेखील अनेकदा तांत्रिक बिघाड होऊन कधी आगीच्या ठिणग्या तर काही वेळा आगीचे लोळ उठत असतात. या रोहित्रावरील तांत्रिक बिघाड नुकताच दुरुस्त करण्यात आला; मात्र तरीही ठिणग्या व लोळची समस्या सुटलेली नाही. याच ठिकाणी सुकलेले गवत असल्याने ठिणगी पडताच ते पेट घेते. त्यामुळे आगीचा धोका वाढतच आहे. मुंबईतील मनीष मार्केटमधील अग्नितांडवाची या मार्केटमध्ये पुनरावृत्ती करायची का? असा सवाल येथील व्यापा-यांनी उपस्थित केला आहे.
छताचे प्लास्टर कोसळले... - फुले मार्केटच्या पहिल्या माळ्यावरील जनरेटरच्या व्हायब्रेशनमुळे दुकान नं.24 व 25 जवळील छताचे प्लास्टर कोसळले आहे. तसेच तीव्र ध्वनिप्रदूषणामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. मोठ्या जनरेटरमुळे छताखालील दुकानांची सुरक्षा अधिक धोक्यात आली आहे. या भागात दररोज सकाळी तीन व सायंकाळी तीन असे एकूण सहा तास वीज भारनियमन असते. त्या कालावधीत जनरेटरचा तीव्र आवाज नजीकचे व्यापारी, कामगार, ग्राहकांना असह्य होत आहे. तसेच विद्युत भारनियमनाच्या कालावधीत दुकानांबाहेर जागोजागी छोटे जनरेटर लावण्यात येतात. त्या वेळी धूर, वायू व आवाजामुळे व्यापा-यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
व्यापा-यांमध्ये संताप - फुले मार्केटच्या छतावरील जनरेटरमुळे आग लागल्याची घटना नुकतीच घडली. हा प्रकार वेळीच लक्षात आला; अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. जनरेटरमुळे आगीच्या घटना व नुकसानाला आमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात त्रस्त व्यापारी व महापालिका प्रशासनाकडे वारंवार गा-हाणे मांडूनसुद्धा कोणीही दखल घेत नसल्याने व्यापा-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन व पोलिसांत तक्रार देऊनदेखील काहीही उपयोग होत नाही.
प्रशासन ढिम्म..... - फुले मार्केटच्या छतावर जनरेटर ठेवणा-या संबंधित व्यावसायिकास अनेकदा आगीच्या धोक्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच जनरेटरच्या व्हायब्रेशनमुळे छतास तडेही जाण्याची भीती असते; परंतु संबंधितांना त्याचे काहीही गांभीर्य नाही. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. विद्युत रोहित्र व वायरिंग रूमही धोकादायक ठरत आहेत. याबाबत तक्रार करूनदेखील प्रशासन लक्ष देत नाही. याप्रकरणी व्यापा-यांची लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल; अन्यथा संभाव्य आगीत असंख्य व्यापा-यांचे मोठे नुकसान होऊ शकते. - अशोक मंधान, अध्यक्ष-सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोसिएशन
वाट कसली पाहता? - आगीच्या घटनांचे प्रमाण वाढत असूनही महापालिका प्रशासन काहीही कार्यवाही करीत नाही. अनेकदा तक्रारी केल्या, महापालिकेवर मोर्चा काढला. तरीही प्रशासनाने नाकर्तेपणा सुरूच ठेवला आहे. प्रशासन अजून कुठल्या अनर्थाची वाट पाहत आहे? विद्युत रोहित्र, वायरिंग रूम व जनरेटरबाबत त्वरित लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- रमेश मताणी, उपाध्यक्ष-सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन
पाठीशी घालण्याचा प्रयत्न - मार्केटमधील अतिक्रमण, असुविधा व आगीच्या घटनांसंदर्भात आयुक्त प्रकाश बोखड यांना व्यापा-यांचे शिष्टमंडळ सोमवारीसुद्धा भेटले. याअगोदरही अधिका-यांना मार्केटमधील स्फोटक परिस्थितीची वेळोवेळी जाणीव करून देण्यात आलेली आहे; परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मूलभूत सुविधा व सुरक्षेसंदर्भात दखल घेण्यात येत नाही तर विविध कर घेताच कशाला? सुरक्षेबाबत तर प्रशासन संबंधितांवर काहीही कारवाई करण्यास तयार नाही. मोठा अनर्थ झाल्यानंतर कारवाई करणार का? गैरकृत्य करणा-यांना राजकीय आश्रय मिळत असून त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. - राजाराम कटारिया, अध्यक्ष-फुले मार्केट व्यापारी असोसिएशन
पाच जणांना नोटिसा - आगीच्या घटनेनंतर अधिकारी-कर्मचा-यांनी चौकशी केली. छतावरील जनरेटर परवानगी न घेताच बसविलेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ते घातक ठरत असल्याने संबंधित पाच व्यापा-यांना त्वरित नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईप्रसंगी कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. तसेच वाढते अतिक्रमणही त्वरित काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - प्रकाश बोखड, आयुक्त -महापालिका
अतिक्रमणामुळे धोका - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचे हे दोन्ही मार्केट एकत्र स्वरूपाचे असून, सर्वाधिक आर्थिक उलाढालीचे आहे. कापड, महिलांची सौंदर्य प्रसाधने व जनरल वस्तूंसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. ग्राहकांची सर्वाधिक वर्दळ या मार्केटमध्ये असते; मात्र किरकोळ वस्तू विक्रेत्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे या मार्केटमधील व्यापारी त्रस्त झाले आहेत.