आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Railway Association Election Issue In Bhusawal

कौल कुणाला: ..ही तर अस्तित्वाची लढाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. रेल्वे संघटनांच्या मान्यतेसाठी 25 ते 27 एप्रिल असे तीन दिवस मतदान होणार आहे. रिंगणात उतरलेल्या पाचही संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापला जाहीरनामा मतदारांसमोर ठेवला आहे. विभागात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू), सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन (सीआरएमएस)मध्ये जोरदार चुरस आहे. रेल कामगार सेनेचे पदाधिकारी वेगाने कामाला लागले असून तिरंगी लढतीत त्यांचीही दावेदारी आहे.

भौगोलिकदृष्ट्या भुसावळ विभागाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. बडनेरापासून ते इगतपुरी (जि.नाशिक) आणि खंडव्यापासून धुळ्यापर्यंतचे क्षेत्र आहे. एवढय़ा मोठय़ा विभागातील 20 हजार 900 मतदारांसमोर पोहोचण्यासाठी निवडणुकीत उतरलेल्या सर्वच संघटनांचे प्रयत्न असले तरी मुख्यालयी सर्वाधिक मतदार असल्याने प्रत्येकाने भुसावळवर लक्ष केंद्रीत केले आहे. उर्वरित ठिकाणी संघटनांचे स्थानिक पदाधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने निवडणुकीसाठी 100 मतपेट्या मागवल्या असून 25 बुथ (भुसावळात 9) असतील. एका बुथवर एक मतदान अधिकारी, दोन कर्मचारी आणि एक शिपाई, अशा चौघांची नियुक्ती असेल. तर प्रत्येक मतदान केंद्रावर चार मतपेट्या असतील. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेची वेळ ठरवून दिली आहे. प्रचारासाठी संघटनांकडून मोबाइलसारख्या साधनांचा वापर सुरू आहे. थेट संपर्क, एसएमएस, पोस्टर-बॅनर्स लावून संघटनेचे मुद्दे मतदारांसमोर ठेवले आहेत. भुसावळातील डीआरएम कार्यालय व इतर ठिकाणच्या भिंती यामुळे रंगल्या आहेत.

70 टक्के मतदार सोबत
भुसावळ विभागात 70 टक्के कर्मचारी आमच्यासोबत जुडलेले आहेत. आमच्या द्वारसभांमध्ये अधिकाधिक उपस्थिती दिसते. संघटनेने कर्मचार्‍यांसाठी केलेल्या संघर्षाची माहिती देतो. आम्हाला मतदान का करावे ? हे समजावून सांगतो. संघटनेने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा कर्मचार्‍यांसह त्यांच्या परिवाराच्या भविष्याचा वेध घेणारा आहे.
-इब्राहिम खान, मंडळ सचिव, एनआरएमयू

पुराव्यानिशी कामे मांडतो
निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांची भेट घेतो. संघटनेने कर्मचार्‍यांसाठी केलेल्या कामाची माहिती देतो. केवळ बोलायचे म्हणून बोलत नाही, तर सर्व पुराव्यांनिशी तारखेसह ही माहिती समोर ठेवतो. मतदारच नव्हे तर इतर संघटनांकडून आम्हास चांगला पाठिंबा मिळत आहे.
-एस.बी.पाटील, मंडळ सचिव, सीआरएमएस

भगवाच फडकवणार
सर्व विभागांमध्ये द्वारसभेसोबत वैयक्तिक संपर्क साधण्यावर आमचा भर देत आहोत. रेल कामगार सेनेसाठी ही अस्तित्त्वाची लढाई आहे. यंदाच्या निवडणुकीत मध्य रेल्वेवर आम्ही भगवा फडकवणारच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आमच्याकडून हीच खरी श्रद्धांजली असेल.
-ललितकुमार मुथा, मंडळ अध्यक्ष, रेल कामगार सेना, भुसावळ

‘सीआरएमएस’चा जाहीरनामा असा
> सातव्या पे कमिशनची नियुक्ती, महागाई भत्ता मूळ वेतनामध्येच देणे
> 1 जानेवारी 2004 पासून भरती झालेल्या कामगारांना लागू असलेली मूळ पेन्शन स्कीम रद्द करणे
> स्टेशन मास्तरांची भरती ग्रेड पे 4200 रुपये करणे. ट्रान्सपोर्ट अलाऊन्सला आयकरातून मुक्त करणे
> ट्रक मेन्टनरच्या फायद्यासाठी बनवलेल्या संयुक्त समितीचा मूळ अहवाल जसा आहे तसा लागू करणे
> लाज्रेस स्कीमवरील प्रतिबंध हटवून ती सर्व कर्मचार्‍यांना लागू करणे
> रेल्वे निवासस्थानांची दुरुस्ती, नवीन निवासस्थानांचे बांधकाम लवकर करणे
> रेल्वे कर्मचार्‍यांच्या मुलांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्राधान्य देणे, चांगल्या दर्जाचे गणवेश मिळणे

एनआरएमयूची आश्वासने
> भारतीय रेल्वे सेवेत पाल्यांच्या नोकरीसाठी प्रत्येक कर्मचार्‍याला स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करणे
> रेल्वे कर्मचार्‍यांसाठी वेज बोर्ड लागू करणे, पीएलबी (उत्पादनावर आधारित बोनस) सिलिंग हटवणे
> सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी ग्रॅज्युइटी साडेसोळा महिन्यांऐवजी साडेचोवीस महिन्यांपर्यंत वाढवणे
> रेल्वेमधून ठेका पद्धत हद्दपार करून ठेकेदारांऐवजी रेल्वे कर्मचार्‍यांच्या मुलांची पर्याय म्हणून भरती करणे
> नवीन पेन्शन योजना रद्द करणे, एससी-एसटी आणि ओबीसी, मागासवर्गीयांच्या रिक्त जागा त्वरित भरणे
> सहाव्या पे कमिशननुसार काही पदे गोठवली आहेत. ही पदे पुन्हा खुली करून भरती अथवा पदोन्नती देणे
> रेल्वे कर्मचारी व त्यांच्या परिवारासाठी शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे

रेल कामगार सेनेची उद्दिष्टे
> रेल्वे कामगारांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य देणे, ‘ग्रुप डी-ग्रुप सी’मधील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी प्रय} करणे
> रेल्वे कर्मचार्‍यांना कमीत कमी 25 हजार रुपयांचा बोनस, नवीन पेन्शन योजना तातडीने रद्द करणे
> लाज्रेस स्कीम योजनेतील भरतीमधील जाचक अटी रद्द करून सर्व कर्मचार्‍यांनी ही स्कीम लागू करणे
>आजारामुळे काम करण्यास असर्मथ ठरलेल्या कर्मचार्‍यास मेडिकली अनफिट फॉर ऑल कॅटेगिरी घोषित करणे
> अनुकंपा तत्त्वावर कार्यरत महिलांच्या जागी त्यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेणे, विशेषत: मराठी मुलांना प्राधान्य
> रनिंग स्टाफला सुधारित मायलेज, ग्रेड पे, एएलपीसाठी रिस्क अलाउंस, मोटरमन आणि गार्ड यांना साप्ताहिक सुटी देणे
> रेल्वे निवासस्थानांची दुरुस्ती, ट्रॅकमनला वयाच्या पन्नाशीनंतर लाइनवर काम न देणे, बारावीनंतर पाल्यांना होस्टेल चार्जे देणे

निवडणूक आखाड्यातील पाचही संघटना
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, मध्य रेल्वे कर्मचारी संघ, महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि रेल कामगार सेना या पाच संघटना निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. भुसावळ, बडनेरा, अकोला, मलकापूर, खंडवा, बर्‍हाणपूर, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, नांदगाव, जळगाव आदी ठिकाणी प्रचाराचा धुराळा उठला आहे. सध्या सर्वांनी भुसावळवर लक्ष केंद्रीत केले आहे. 20 हजार 900 मतदार असून प्रचार कालावधीत अधिकाधिक कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.