आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाक्रमांकाच्या दुचाकींमुळे सोनसाखळीचोरांचे फावतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- शहरात विचित्र नंबरप्लेट असलेल्या व विनाक्रमांकाच्या दुचाकींची संख्या वाढत आहे. या वाहनांचा वापर करून धूमस्टाइल चोर्‍या वाढल्याचा अंदाज आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत धूमस्टाइलने चोरीच्या जवळपास 20 घटना घडल्या असून, पोलिसांना एकही चोरी उघड करता आलेली नाही. त्यामुळे दागिने घालून बाहेर निघणे महिलांसाठी कठीण झाले आहे. मागील दोन दिवसात दोन महिलांच्या सोनसाखळय़ा चोरीस गेल्या आहेत.
सोनसाखळीचोरांना धूमस्टाइलने महिलांच्या पोत लंपास करण्यात विनाक्रमांकाच्या दुचाकींची चांगलीच मदत होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार स्थानिक पोलिस प्रशासन व आरटीओ विभाग आहे. वाहनचालकांवर पोलिसांचा वचक नसल्याने शहरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील महिन्यात डेराबर्डी भागात अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा अद्याप तपास लागलेला नाही. दोन वर्षांपासून सोनसाखळीचोरांवर पोलिसांना अंकुश बसवता आलेला नाही. डीबी पथक व गोपनीय विभागातील अनेकअनुभवी कर्मचारी शहरातील जनतेला केवळ पोकळ धाक दाखवतात. साध्या गणवेशाच्या जोरावर उपद्रवी नागरिकांची गोपनीय माहिती ठेवली जाते; मात्र खर्‍या आरोपींपर्यंत हे कर्मचारी पोहोचत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.

पोलिसांची नाके बंदी केवळ दिखावा
पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कार्यभार सांभाळल्यावर वाहनांची तपासणी व नाकेबंदी करत कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो नंतर दिखावाच ठरला. विनानंबर वा नंबरप्लेटवर नंबर न टाकता काहीतरी चित्र, नावे काढलेली अनेक शहरात वाहने आहेत. त्यांचाच वापर धूमस्टाइल चोरीसाठी होत आहे. त्यामुळे चोर व त्यांना मदत करणारे कोण? याचा तपास लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे

भडगाव रोडवर धोका
धूमस्टाइलने महिलांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा तोडण्याच्या सर्वाधिक घटना भडगाव रोड भागात घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी याच भागातील दोन महिलांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा चोरीस गेल्या. दत्त मंदिर ते कापड मिल, शास्त्रीनगर व गजानन कॉलनी याच भागात मंगळसूत्रचोरीच्या 10 ते 12 घटना घडल्या आहेत. वर्दळीचा मार्ग व पळून जाण्यासाठी अनेक रस्ते असल्याने हा भाग चोरट्यांसाठी ‘सोने की अंडी’ बनला आहे. पोलिसांची गस्त या भागात वाढावी.

पल्सरचा वापर
धूमस्टाइलने महिलांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा तोडण्यासाठी पल्सर व करिझ्मा वाहनांचा वापर होत असताना दिसतो. महिलांनी पोलिस ठाण्यात यापूर्वी वाहनांचे वर्णन दिलेले आहे; मात्र पोलिसांकडे जुनी वाहने असल्याने ते चोरट्यांचा पाठलाग करू शकत नाहीत. पोलिसांपेक्षा चोरट्यांकडे चांगली वाहने आहेत. गेल्या काही चोरीच्या घटनांतील फिर्यादी महिलांनी सांगितलेल्या वाहनांच्या वर्णनानुसार पल्सर व करिझ्मा वाहनांचा वापर धूमस्टाइल चोरीसाठी होत असल्याचे उघड झाले आहे.

विनानंबरच्या गाड्या
शहरात विचित्र नंबर वा विनाक्रमांकाचे वाहन वापरणार्‍यांमध्ये राजक ारणी, गुंड प्रवृत्तीचे लोक, बड्यांचे नातेवाईक, उद्योजक, व्यावसायिक, पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आवडीच्या नंबरचे कारण दाखवून या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. कारण पोलिसांकडून किरकोळ कारवाई होत असल्याने कायद्याला ते जुमानत नाहीत. हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी मागणी जनतेतून आहे.