आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळीचोरीत मुंबई परिसरातील ‘इराणी गँग’ सक्रीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात गेल्या चार दिवसांत तीन ठिकाणी सोनसाखळीचोरीच्या घटना घडल्या. यातील दोन घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. यातील दोघे चोरटे मुंबईतील अांबिवली भागात राहणारे इराणी गँगचे सदस्य असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. असीम गरीबशाह इराणी आणि सरफराज फिरोज इराणी अशी दोघांची नावे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.
 
सोनसाखळी चोरीतील असीम हा मूळचा श्रीरामपूर येथे राहणारा आहे. पण तो आंबीवलीत राहणाऱ्या सरफराजच्या सोबतच विविध गुन्ह्यांमध्ये संशयित आहे. या दोघांनी मिळून मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये अनेक गुन्हे केले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ते जळगावात आले असून त्यांनी या तीनही सोनसाखळी ओढल्याचे गुन्हे केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
 
7 एप्रिल रोजी चंद्रमा अपार्टमेंट येथून ६० वर्षीय निवृत्त शिक्षिका विजया कदम यांची तर रविवारी सकाळी वाजता वर्षा कॉलनी येथून नलिनी भाेळे तर ७.३० वाजता गुजराती गल्लीमधील रेखाबेन कोठारी यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली. या तीनही घटनांमध्ये भामट्यांची वापरलेली पद्धत एकच होती. त्यामुळे इराणी गँगवरचा संशय पक्का झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इराणी गँगकडून मुंबईत पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. त्याच परिसरातील हे रहिवासी असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने त्यांचा माग सुरू केला आहे.

चौकशीसाठी पथक मुंबईला रवाना
सोमवारी इराणी गँगच्या दोन्ही भामट्यांवर संशय बळावल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. तर जिल्हापेठ पोलिसांनी भुसावळला जाऊन चौकशी केली आहे. जळगावात या दोघा भामट्यांनी वापरलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.
बातम्या आणखी आहेत...