आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएचआरचे रायसोनींसह १३ संचालकांना अटक, १७ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट कॉ ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (बीएचआर) शाखेत १७ लाख रुपयांचा अपहार प्रकरणी संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह १३ संचालकांना सोमवारी अटक करण्यात आली. जळगावच्या शिव कॉलनी शाखेत शिवराम चावदस चौधरी (वय ७५) यांच्या १७ लाख २ हजार ५७४ रुपयांच्या ठेवी होत्या. मुदत पूर्ण होऊनही ठेवीचे पैसे परत मिळत नसल्यामुळे त्यांनी सोमवारी पहाटे ३.३० वाजता रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अवघ्या तीन तासांत रायसोनी यांना त्यांच्या बळीरामपेठेतील घरातून ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ १२ संचालकही गजाआड झाले.

शिवराम चौधरी यांनी २२ ऑक्टोबर २०१० पासून बीएचआरमध्ये पैसे ठेवले होते. ते परत मिळत नव्हते. त्यामुळे रविवारी रात्री अपहार झाल्याबद्दलची फिर्याद दिली. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर पहाटे ३.३० वाजता रायसोनी यांच्यासह १५ संचालकांवर अपहार, फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी रायसोनींच्या अटक केली. त्यानंतर दुपारपर्यंत आणखी १२ संचालकांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये प्रमोद रायसोनी, इंद्रकुमार ललवाणी, सुकलाल माळी, डॉ.हितेंद्र यशवंत महाजन, मोतीलाल ओंकार जिरी, दादा पाटील, दिलीप चोरडीया, सुरजमल जैन, भागवत संपत माळी, यशवंत जिरी, शेख रमजान शेख अब्दुल नवी मन्यार, राजाराम कोळी, भगवान हिरामण कोळी यांचा समावेश आहे. ललिताबाई राजू सोनवणे आणि प्रतिभाबाई मोतीलाल जिरी या दोन महिला संचालकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

देशभरात २५२ शाखा
बीएचआरच्या देशात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छतीसगडमध्ये २५२ शाखा आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील ढोलेरोड शाखेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस आल्यानंतर बीएचआर चर्चेत आली. त्यानंतर हळूहळू राज्यातील सर्वच शहरांमधील ठेवीदारांनी ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावला. एकाच वेळी पैसे परत देण्याची वेळ आल्यामुळे बीएचआरने अनेक शाखा बंद केल्या. राज्यात दाखल पाच गुन्ह्यांमध्ये रायसोनी यांच्यासह संचालकांनी अटकपूर्व जामीन मिळवले आहेत.