आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवी बुडवून फरार झालेला पतसंस्थेचा चेअरमन अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भुसावळ येथील बढे पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या मुदत ठेवी बुडवल्याच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचमध्ये सुरू प्रकरणात चेअरमन चंद्रकांत हरी बढेला न्याय मंचाने फरार घोषित करून अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. याप्रकरणी त्याने केलेला जामीन अर्ज न्याय मंचाचे अध्यक्ष अतुल आळसी यांनी फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.   

भुसावळ येथील चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेतील  ८० हजार रुपयांची मुदत ठेव परत करत नसल्याच्या प्रकरणामध्ये अमजद खान अली शेर खान (रा. वरणगाव) यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये ६ एप्रिल २००९ मध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीच्या एकाही तारखेला बढे उपस्थित राहिलेला नाही. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावरून न्याय मंचाने ७ मार्च २०११ रोजी वसुलीचे आदेश दिले होते. मात्र, बढे याने त्यालाही काहीच प्रतिसाद न दिल्याने न्याय मंचाने त्याला नोटीस बजावली होती.  शेवटी न्याय मंचाने त्याला फरार घोषित करून अजामीनपात्र वॉरंट काढले होते. अजामीनपात्र वॉरंटप्रकरणी बढे याने न्याय मंचात जामीन अर्ज केला होता. शुक्रवारी बढे न्याय मंचात हजर झाला. मंचाचे अध्यक्ष आळसी यांनी जामीन अर्ज फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
बातम्या आणखी आहेत...