आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव बीडीओंच्या कामकाजाची करा चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी मालती जाधव यांच्या कामकाजाविषयी असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची चौकशी करण्याचा ठराव बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड यांनी ही मागणी केली. शालेय पोषण आहारातील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे नमुनेच सदस्यांनी सभागृहात सादर केल्याने कंत्राटदार सादर करत असलेला प्रयोगशाळेचा अहवाल घेणे बंद करण्याचे व शाळेतून नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडून तपासून घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी दिले.

महिला बीडीओंची मनमानी
चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मालती जाधव यांनी हजेरीपत्रक हरवले आहे. बोरखेडा, खडकी व सांगवी येथील मजुरांना एक महिन्याची मजुरीही दिली नाही व परिसरातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव सादर करूनही त्यांना मंजुरी दिली नाही. याशिवाय जाधव या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा विषय समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड व शिक्षण सभापती रक्षा खडसे यांनी मांडला. खोडपे यांनी चौकशीचे आदेश दिले.

निकृष्ट पोषण आहार साहित्य
पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार सदस्य अँड.व्ही.आर.पाटील यांनी मांडली. बैठकीस कांताबाई मराठे, अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, विजय पाटील, प्रभाकर सोनवणे, सुरेश धनके यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड उपस्थित होते.


हे झाले ठराव
0 खारघर येथील निवासस्थानासाठी जिल्हा परिषद पाच लाख रुपये देणार.
0 मौजे विखरण (ता.एरंडोल) येथील तात्पुरत्या पाणी योजनेच्या 30 लाख 54 हजार रुपयांच्या निविदेस मंजुरी.
0 निंभोरा ग्रुप ग्रामपंचायतीतून पिंप्रीसेकम ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यास मंजुरी.
0 रिगाव, डोलारखेडा व मोरझिरा (ता.मुक्ताईनगर) यांच्याही स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव.
0 मोराव्हल, जिन्सी, गुलाबवाडी, मंगरूळ, जुनोना (ता.रावेर) यांचाही प्रस्ताव.
0 वावडदा व वडली (ता.जळगाव) या भागात पाणी योजनेचे काम रखडल्याची तक्रार.
0 बांभोरी (ता.धरणगाव) येथे 13 लाख रुपये खर्चाच्या पाणी टाकीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार.