आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधून चंदू चव्हाण परतला, चुकून गेला हाेता पाक हद्दीत, चंदूला मिळाले नाही जेवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाकमध्ये अंधारकाेठडीत तीन महिन्यांचा काळ घालवलेला सैन्यातील जवान चंदू चव्हाण म्हणताे, की ‘घरी परत येईन, यावर विश्वासच नव्हता. अाता तर मला उजेडाचीही भीती वाटते’. त्याच्या चेहऱ्यावरही ही भावना दिसत होती. ‘पाकिस्तानमधील काळकाेठडी अाठवली की अंगावर काटे उभे राहतात’, असे चंदू म्हणाला.

पाकिस्तानात चंदूचे काय हाल झाले असतील हे त्याच्या हालचालींवरून दिसत होते. दाेघांचा अाधार घेऊनच चालू शकताे. खाली बसतानाही त्याला वेदना होतात. एवढे सहन करूनही  त्याचा अात्मविश्वास मात्र ढळलेला नाही.  सैन्यात परतण्याची ऊर्मी कायम अाहे. एक महिन्याच्या सुटीनंतर मी सैन्यात परतेन, असा विश्वास त्याने बाेलून दाखवला. चुकून पाक हद्दीत शिरलेला सैन्य दलाचा जवान चंदू चव्हाण मुळात जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये कार्यरत हाेता. सप्टेंबर महिन्यात तो चुकून पाक हद्दील गेला. त्यानंतर त्याला पाकिस्तानी जवानांनी पकडले. भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर २१ जानेवारीला त्याला भारतात अाणण्यात अाले. शनिवारी तो धुळे तालुक्यातील मूळ बाेरविहीर गावी आला. संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी त्याला थेट घरापर्यंत आणून साेडले. चंदू चव्हाण याच्यावर दीड महिन्यापासून अमृतसर येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यानंतर त्याला दिल्लीला अाणण्यात अाले. तेथून संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यासाेबत त्याला विमानाने इंदूरपर्यंत व त्यानंतर कारने धुळे शहर व पुढे बाेरविहीरपर्यंत अाणण्यात अाले. दरम्यान सैन्य दलाकडून अजूनही चंदू चव्हाणची चाैकशी सुरू अाहे. त्यामुळे त्याला व त्याचा भाऊ भूषण यालाही इतरांशी संवाद साधण्यासाठी मर्यादा घालण्यात अाल्या आहेत. 
 
अंगावर काटा उभा राहतो. : चंदू म्हणाला, “घरी परत येईन, यावर विश्वासच नव्हता. मात्र, संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यासह केंद्र सरकारने यात लक्ष घातल्यामुळे माझी सुटका होऊ शकली. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले अत्याचार अाठवले तरी अंगावर काटा उभा राहताे. अाता उजेडाची मला भीती वाटू लागते...अर्धवट गुंगीतच मी भारतात परतलो. सततच्या अंधारामुळे नेमके कुठे ठेवले हाेते हे कळत नव्हते.’
 
चंदू वेदनांनी दाेनदा विव्हळला
चंदू चव्हाणला धुळे व बाेरविहीर येथेही डाॅ. सुभाष भामरे यांच्या वाहनातून उतरवताना दाेघांचा अाधार द्यावा लागला. घरापर्यंतही ताे अाधाराशिवाय चालू शकला नाही. घरापासून परत मंदिरापर्यंत त्याच्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमातही त्याला दाेघांनी अाधार देऊन अाणले. तेव्हा पाऊल टाकताना ताे विव्हळला. व्यासपीठावर त्याला त्याचा भाऊ भूषण याने पाय सरळ करायला मदत केली. तेव्हाही ताे वेदनांनी विव्हळल्याचे जाणवले.
 
सैनिकी गणवेशात, तरीही सैन्याची अाेढ
चंदू चव्हाणला थेट बाेरविहीरपर्यंत अाणताना त्याच्या अंगावर सैनिकी गणवेश कायम हाेता. गावातही ताे याच गणवेशात वावरला. तरीही ताे बाेलताना सैन्यात परत जायचे अाहे, असे वारंवार सांगत हाेता. मुळात त्याला केवळ एक महिन्याची सुटी देण्यात अाली अाहे. अमृतसरमध्ये उपचार सुरू असताना त्याला कुटुंबात रमू दिले तर ताे लवकर बरा हाेईल, असा विचार करून त्याला सुटी देण्यात अाली अाहे. मात्र त्याची सैन्याची अाेढ अद्यापही कायम अाहे.
 
झाेप हाेते अनावर
चंदू चव्हाण याच्यावर दीड महिन्यापासून उपचार सुरू असले तरी त्याच्या देहबाेलीवरून ताे पूर्णत: बरा झालेला नाही, असे दिसते. शनिवारी दुपारी त्याला झाेप अनावर हाेत हाेती. वारंवार ताे झाेपण्यासाठी खाेलीत जात हाेता. त्यामुळे त्याच्यावरील पाकिस्तानात झालेल्या प्रयाेगांचे अवशेष कायम अाहेत की काय, असा संशय येत हाेता.
 
डाॅ. भामरेंनी २० मिनिटांत साेडले बाेरविहीर
चंदू चव्हाणला थेट घरापर्यंत साेडायला अालेले संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी वीस मिनिटांतच बाेरविहीर हे गाव साेडले. चंदूला घरी साेडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यानंतर चंदूसाठी असलेल्या कार्यक्रमात केवळ दाेन मिनिटे बाेलून ते धुळ्याकडे रवाना झाले.
 
चंदूला मिळाले नाही जेवण
- पाकिस्तानात वाट चुकून गेलेल्या चंदूला त्या देशाने अंधार काेठडीत ठेवले. त्याच्या अंगावर ठिकठिकाणी सुया टाेचल्याच्या खुणा अाहेत. त्यावरून त्याच्यावर माेठा अत्याचार झाल्याचे जाणवते. त्याला पाकिस्तानात असताना दाेन ते तीन दिवस जेवण दिले जात नव्हते. भारतात अाल्यावरही ताे अर्धवट गुंगीत हाेता, हेही जाणवले. त्यातून ताे अद्याप सावरलेला नाही.
चिंधू धाेंडू पाटील, अाजाेबा
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...