आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा राष्ट्रवादीत बदलाचे वारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पक्षसंघटन आणि निवडणुका या दोन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या फेरबदलानंतर जिल्हा संघटनेतही बदल होण्याचे संकेत आहेत. येत्या रविवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीने प्रदेशस्तरावरून माहिती घेण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर पक्ष नेतृत्वाने मुंबईत संयुक्त बैठक बोलावून जिल्ह्यातील पदाधिका-यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर सकारात्मक बदल अपेक्षित असताना विधान परिषदेतील उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची नामुष्की ओढवली आहे.

संघटनात्मक बदलाचे वारे : पक्षसंघटनेतील वाद, आपसातील मतभेद आणि कुरघोड्यांच्या राजकारणाला सांभाळू न शकणा-या पदाधिका-यांकडील पदे काढणे, नवीन सक्षम पदाधिका-यांची नियुक्ती करणे, विधानसभेसाठी इच्छुकांची चाचपणी करणे या दृष्टीने अजित पवार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षाच्या मोठ्या पदाधिका-यांवर या वेळी पक्षसंघटनेची जबाबदारी टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजी-माजी खासदार, आमदार आणि इतर महत्त्वाच्या पदाधिका-यांची स्वतंत्र बैठकदेखील होणार आहे.

रविवारच्या दौ-याकडे लक्ष
रविवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौ-यावर येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनाबाबत ते ठोस निर्णय घेण्याचे संकेत आहेत. मोठी ताकत असल्याने विधानसभेत पक्षाचे लोकसभेप्रमाणे पानिपत होऊ नये म्हणून अजित पवार स्वत: लक्ष घालणार आहेत. त्या दृष्टीने रविवारच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.