आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर प्रकरणी संचालकांवर न्यायालयात दोषारोप दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेविरोधात रामानंदनगर शाखेत दाखल असलेल्या गुन्ह्यात बुधवारी न्यायाधीश एमक्यूएसएम शेख यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १३ संचालकांवर दोष ठेवण्यात आले आहे.

शिव कॉलनी येथील बीएसआरचे ठेवीदार शिवराम चावदस चौधरी (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजता रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी सर्व संचालकांना अटकही करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी बुधवारी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तसेच या प्रकरणातील फिर्यादी चौधरी यांच्यातर्फे अॅड.हरूल देवरे यांनी वकीलपत्रही सादर केले आहे.

बड्या भागीदारांचा उल्लेख
प्रमोद रायसोनी यांची बीएचआरच्या नावाखाली बेनामी मालमत्ता जमवली आहे. मुंबई, पुण्यातील काही उद्योजकांसोबत त्यांच्या भागीदारी आहेत. ठेवीदारांचा पैसा स्वत: नातेवाइकांच्या उद्योग, व्यवसायासाठी वापरल्याचे पोलिस चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे.

मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न
बीएचआरच्याविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या कायद्यात ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पतसंस्थाचालकांच्या मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. त्यासाठी गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात सादर होणे आवश्यक असते. आता रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोप दाखल झाल्यामुळे रायसोनी यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याचे अॅड.हरूल देवरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

रायसोनींच्या कोठडीत वाढ
रायसोनींसह१२ संचालकांना २५ मार्च रोजी उस्मानाबाद शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी रायसोनी यांच्या कोठडीत पुन्हा दाेन दिवसांची वाढ करण्यात आली, तर इतर ११ संचालकांना बुधवारी जळगाव कारागृहात पाठवण्यात आले आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या शाखांमधील वीजबिल भरणा केंद्र त्वरित बंद केले आहे, असे पत्र महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने तीन दिवसांपूर्वी बीएचआरच्या मुख्य शाखेला पाठवले आहे. फेब्रुवारी रोजी बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनींसह १३ संचालकांना रामानंदनगर पोलिसांनी गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर राज्यभरातील सात पोलिस ठाण्यांमधील दाखल गुन्ह्यांमध्ये रायसोनी टीमला ट्रान्सफर करण्यात आले आहे. बीएचआरच्या राज्यभरातील ५० पेक्षाजास्त शाखांमध्ये अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्या पार्श्वभूमीवर बीएचआरमध्ये सुरू असलेल्या वीजबिल भरण्याच्या रकमेतही अपहार झाला असल्याने विद्युत कंपनीचा महसूल बुडाला आहे. या कारणामुळेच बीएचआरला दिलेले सर्व वीजबिल भरणा केंद्र २७ मार्चपासून बंद करण्यात आले आहेत. या संदर्भात जळगाव परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांच्या स्वाक्षरीचे पत्र बीएचआरला पाठवण्यात आले आहे.