आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर प्रकल्प बाधितांना धनादेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - महिन्याभरापूर्वी वाघूर बॅकवॉटरमधील हिवरखेडा बुद्रूक गावातील संपादित घरांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आमदार गिरीश महाजन, अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील, कार्यकारी अभियंता एस.पी.काळे आदींनी गावात भेट दिली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्याबाबतच्या समस्या आमदार महाजन व अधिकार्‍यांसमोर मांडल्या होत्या. यावेळी अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील यांनी ग्रामस्थांना तत्काळ प्रत्येकी 10 हजार रुपये विस्थापित भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता शनिवार (दि.26) रोजी 139 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये विस्थापित भत्ता देऊन करण्यात आली.

कांग नदीच्या काठावर असलेल्या गावाला यावर्षी जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील 139 घरांना मोठय़ा प्रमाणावर समस्या जाणवत होत्या. याची पाहणी करण्यासाठी आमदार गिरीश महाजन व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकल्या व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. या 139 कुटुंबीयांना महिन्याभराच्या आत वाहतूक भत्ता देऊन त्यांना स्थलांतरित करण्याचे आदेश आमदार महाजन यांनी यावेळी दिले होते.

आमदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून विस्थापित लाभार्थींना प्रत्येकी 10 हजार रुपये द्यावे याबाबत धनादेश मंजूर केले. यावेळी ग्रामस्थांनी विस्थापित कुटुंबांना नागरी सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी अधिकार्‍यांकडे केली.


यांची होती उपस्थिती
या धनादेशाचे वाटप हिवरखेडा येथे सरपंच मंगलाबाई पाटील, अभियंता एस.पी. काळे, अभियंता विनोद बागुल, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, कनिष्ठ अभियंता सी.के. पाटील, उपसरपंच अरुण चौधरी, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक योगेश पालवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते