आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे लिलावास मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे लिलावाच्या आदेशाला तोंडी स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी लेखी आदेश दिले. याबाबतचा आदेश महापालिकेला गुरुवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. गाळ्यांसंदर्भात कोणता मार्ग काढता येईल यावर चर्चा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारीला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
हुडकोला कर्जाचा भरणा करण्यासाठी व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव करून रक्कम उभी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याविषयाला मनसेने विरोध केला होता. तसेच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी लिलावाला तोंडी स्थगिती दिली होती. मात्र तरीही प्रशासनाकडून लिलावाच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे खडसेंनी बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन लिलावामुळे गाळेधारकांवर अन्याय होणार आहे. मार्केटची जागा ही शासकीय असल्याने अन्य पर्याय शोधण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाळे लिलावाच्या स्थगितीचा लेखी आदेशाचा फॅक्स प्रधान सचिवांना पाठवला असल्याची माहिती खडसे यांनी दिली. चर्चेदरम्यान खासगी सचिव आशिष सिंग,डॉ. गुरुमुख जगवानी उपस्थित होते.
सोमवारी निघणार मार्ग
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मनपाच्या मालकीच्या गाळ्यांसंदर्भात कोणता मार्ग काढता येईल यावर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुख्य सचिव, विरोधी पक्षनेते खडसे, नगरविकास विभागाचे सचिव र्शीकांत सिंग, महापालिका आयुक्त संजय कापडणीस तसेच व्यापारी प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन मार्ग काढण्यात येणार आहे. यात गाळे रेडीरेकनरच्या दराने तसेच 30 वर्षांसाठी द्यावेत की अन्य काही मार्ग काढता येईल, यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.