आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिव्हिल’ बालमृत्यूप्रकरणी पाच डॉक्टरांचा हलगर्जीपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यावर्षभरात सिव्हिल रुग्णालयात ४४० बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समितीने पाच डॉक्टर, दोन सिस्टर इंचार्ज आणि एक ऑपरेटर यांच्यावर ठपका ठेवला आहे. या त्रिसदस्यीय समितीने बालमृत्यूप्रकरणी आपला अहवाल आरोग्य उपसंचालकांना सादर केला आहे. डॉक्टरांसह सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा,अक्षम्य दुर्लक्षामुळे वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ताशेरेही अहवालात ओढण्यात आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयू विभागात वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याप्रकरणी दीपककुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागवली होती. त्यांना रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘दिव्‍य मराठी’ने या गंभीर प्रकरणाविषयी ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताचा आधार घेऊन गुप्ता यांनी नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांकडे चौकशी करण्याची मागणीही केली होती. उपसंचालकांनी दखल घेऊन जळगावच्या जिल्‍हा शल्यचिकित्सकांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा शल्यचिकित्सकांंनी बालमृत्यूची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीने चार महिने सखोल चौकशी करून आपला १६५ पानी अहवाल सादर केला आहे. समितीने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्‍हा सामान्य रुग्णालयात गेल्या वर्षी पूर्णवेळ बालरोगतज्ज्ञ नव्हते. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली होती.
समितीने या केल्या शिफारशी
*एसएनसीयू येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण हवे. त्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला पाहिजे.
* शासनाच्या आकृतीबंधानुसार पदे पूर्ण भरावी.
* एसएनसीयूत सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल एसी सेंट्रल सेक्शनची व्यवस्था होणे गरजेचे आहे.
* पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यांच्या हजेरीपत्रकासाठी लेट मस्टर ठेवून नियंत्रण वाढवता येईल.
* कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणूक आदेशामध्ये कामाच्या स्वरुपाचा स्पष्ट उल्लेख असावा.