आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Death For Boarwell Issue At Sakri District

कूपनलिकेत पडलेल्या बालकाचा अखेर मृत्यू; साडेतेवीस तासांचे प्रयत्न अखेर निष्फळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- साक्री तालुक्यातील तांदळी शिवारातील उघड्या कूपनलिकेत शुक्रवारी पडलेल्या बालकाचा अखेर मृत्यू झाला. एका मेंढपाळ कुटुंबाचा चार वर्षीय मुलगा भटू याला बाहेर काढण्यासाठी साडेतेवीस तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते निष्फळ ठरले. केवळ केसिंग पाइप नसल्याने या बालकाला जीव गमवावा लागला.
पोटापाण्यासाठी वणवण फिरणारे साक्री तालुक्यातील आयने येथील मेंढपाळ सीताराम धनगर शुक्रवारी तांदळी शिवारात शेळ्या-मेंढ्यांसह दाखल झाले. शेतात प्रवेश करताना उघड्या कूपनलिकेची या कुटुंबाला माहिती नव्हती. छोटा भटू खेळताना त्यात पडला. माहिती मिळताच शेकडो लोक मदतीसाठी धावले. साडेतेवीस तास प्रयत्न करून त्याला शनिवारी दुपारी 3.30 वाजता बाहेर काढण्यात आले. मात्र, तोवर बालकाचा श्वास बंद झाला होता.
ज्या ठिकाणी कूपनलिका खोदण्यात आली, ती जागा अडचणीची आहे. तेथे केवळ जीप, ट्रॅक्टर वा ट्रक पोहोचू शकत होते. गावापासून दीड किलोमीटरवर हे शेत असल्याने अडचणी वाढल्या; परंतु तरीही शासकीय यंत्रणा शर्थ करत होती. प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार प्रमोद हिले, एपीआय परदेशी हे बालकाला बाहेर काढेपर्यंत तेथेच थांबून होते.

लष्करी जवानांची मदत
बचावकार्य पथकाची कसरत सुरू असताना मदतीला भुसावळ येथील भारतीय सैन्य दलाची एक तुकडी दाखल झाली होती. बघ्यांची गर्दी पाहता पोलिसांची अतिरिक्त तुकडीही मागवण्यात आली होती.