आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Development Department's Car Issue At Bhusawal

भुसावळ येथील बालविकास प्रकल्पाचे वाहन पाच वर्षांपासून धूळखात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तालुक्यातील अंगणवाड्यांच्या तपासणीसह इतर शासकीय कामकाजासाठी महिला व बालकल्याण विकास विभागातर्फे भुसावळ येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला एक चारचाकी वाहन (जीप) देण्यात आले आहे. मात्र, 2008 पासून हे वाहन नादुरूस्त असल्याने वापराअभावी ते पडून आहे. दीर्घकाळापासून वाहन पडून असल्याने वाहनाचा वापर कचराकुंडीसारखा केला जात आहे.

वाहनाअभावी पर्यवेक्षिका आणि अधिकार्‍यांना अंगणवाड्यांच्या तपासणीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला व बालकल्याण विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारे तालुक्यातील 182 अंगणवाड्यांचा कारभार चालवला जातो. या अंगणवाड्यांमध्ये 182 सेविका आणि 172 मदतनिस कार्यरत आहेत. या सर्व अंगणवाड्यांच्या कामकाजावर नियंत्रणासाठी तालुका स्तरावर एक अधिकारी आणि तपासणीसाठी सात पर्यवेक्षिकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील 52 गावे आणि त्यातील विविध भागांत असलेल्या अंगणवाड्यांची नियमित तपासणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

या मुळे पर्यवेक्षिका आणि अधिकार्‍यांना अंगणवाड्यांची तपासणी करणे सोईस्कर व्हावे, जिल्हा पातळीवरील बैठकांसाठी अधिकार्‍यांना उपस्थिती देता यावी, यासाठी बालविकास प्रकल्प विभागाला एक जीप (क्रमांक- एम.एच.19/ सी.5578) 1994- 1995 मध्ये देण्यात आली आहे. मात्र, योग्य देखभाल दुरुस्तीअभावी हे वाहन 2008 पासून नादुरूस्त अवस्थेत कार्यालयाबाहेर उभे आहे. या जीपचा सद्यस्थितीत कचराकुंडीसारखा वापर होत आहे. वाहनाअभावी पर्यवेक्षिका आणि अधिकार्‍यांना तालुक्यातील अंगणवाड्यांच्या तपासणीसाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात 19 एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यापैक रावेर, अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांच्या प्रकल्पांमधील वाहनेच सद्यस्थितीत सुरू आहेत.

चालक मुख्यालयी
जिल्ह्यातील किमान 90 टक्के शासकीय वाहनांची दुरुस्ती निधीअभावी रखडल्याने वाहने नादुरूस्त अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे नादुरूस्त वाहनांवरील चालकांना मुख्यालयी हजर करण्यात आले आहे.

पत्रव्यवहार केला आहे
नादुरूस्त वाहनाबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. वाहन नसल्याने अंगणवाडी तपासणी आणि इतर कामांसाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. व्ही. एन. भाटकर, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, भुसावळ