आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा महिन्यांत बाललैंगिक शोषणाचे 21 गुन्हे उघड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - निष्पाप व अजाणतेचा फायदा घेऊन होणार्‍या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. जिल्ह्यात 15 पोलिस ठाण्यांमध्ये दहा महिन्यात बाललैंगिक शोषणाचे तब्बल 21 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यावरून या प्रकरणांची गंभीरता लक्षात येते. या बाबीला चाप लावण्यासाठी कठोर धोरणाची तसेच शिक्षेची तरतूद करण्यात आली असली तरी अन्याय-अत्याचाराचे प्रकार थांबलेले नाहीत. बालदिनाच्या पार्श्वभूमीवर बाललैंगिकतेचे गंभीर प्रकार रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

लहान मुलांवरील लैंगिक शोषणाच्या बीभत्स प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने सन 2012मध्ये बालकांच्या लैंगिक छळास प्रतिबंध अधिनियम (द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्सेस अँक्ट) ची तरतूद केली आहे. असे असताना बालकांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. धुळे जिल्ह्याची जानेवारी 2013 पासूनची आकडेवारी पाहता हा धक्कादायक प्रकार लक्षात येतो.

मागील साडेदहा महिन्यांत शहर परिसरातील विविध 15 पोलिस ठाण्यांत असे 21 गुन्हे दाखल झाल्याची नोंद गोपनीय विभागाकडे आहे. यापैकी आठ गुन्हे हे केवळ धुळे शहरात घडले आहेत. तर उर्वरित 13 गुन्हे हे ग्रामीण भागातील आहेत. त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यापैकी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास लावला आहे. बालकांच्या लैंगिक शोषणाची 2012 मधील आकडेवारी पाहता अशा स्वरूपाचे सुमारे 20 गुन्हे दाखल झाले होते.

2013मध्ये महिनानिहाय आकडेवारी पाहता जानेवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै या महिन्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये प्रत्येकी तीन तर ऑक्टोबर महिन्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ नोव्हेंबर महिन्यात दाखल गुन्ह्यांची संख्या पाचपर्यंत गेली आहे. गेल्या साडेदहा महिन्यांत केवळ फेब्रुवारी व मे महिन्यात अशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल झाल्याची पोलिस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

प्रवृत्तींना चाप बसेल
कायदा कठोर झाला असला तरी त्याची अंमलबजावणीही तेवढीच कठोरपणे होत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये न्यायालयही गांभीर्य ओळखून योग्य तो निर्णय देते. कायद्यातील तरतुदीमुळे असल्या घटनांना नक्कीच चाप बसेल. अँड. एन. डी. सूर्यवंशी, ज्येष्ठ विधिज्ञ, धुळे.

काय म्हणतो कायदा..
या नवीन कायद्यानुसार दोषींवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान तीन वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. शिवाय गुन्ह्याचा प्रकार अतिगंभीर स्वरूपाचा असल्यास दोषीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

दोन गुन्ह्यांत नातलग
21 गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये नात्यातील व्यक्तीने अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. दोन्ही गुन्ह्यातील नातलग पीडितांच्या जवळचे आहेत. उर्वरित 19 प्रकारांमधील संशयित हे पीडितांचे नातलग नसले तरी त्यांच्या कुटुंबाच्या परिचयातील असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीच नव्हे मुलेही
17 वर्षांपर्यंतच्या पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या कायद्यान्वये केवळ मुलीच नव्हे तर मुलांवरही अत्याचार केल्यास संबंधिताला कठोर कायद्यान्वये शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान सर्व 21 घटनांमध्ये मात्र पीडित केवळ मुलीच आहेत.