आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Helpline India Foundation Stopped Minor Marriage

अल्पवयीन मुलीचा निकाह रोखला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विवाहयोग्य वय नसतानाही मुलीचा विवाह रविवारी दुपारी 12च्या मुहूर्तावर करण्याचे मनसुबे महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या चाइल्ड हेल्पलाइन इंडिया फाउंडेशनने उधळून लावले. मुलीचे वय 16 असल्याने कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर हा विवाह रोखण्यात आला. दरम्यान, याबाबत समजावून सांगितल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी विवाहाच्या खर्चात साखरपुडा उरकला. तांबापुरा भागात हा विवाह होणार होता.

लग्नासाठी मुलाचे वय 21 व मुलीचे 18 वर्षे पूर्ण असलेच पाहिजे, असा कायदा आहे; मात्र या कायद्याचे उल्लंघन करत अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. जळगावात अमर चाइल्ड हेल्पलाइनअंतर्गत नऊ जणांची टीम मुलांच्या समस्या निराकरणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. याच माध्यमातून रविवारी तांबापुरात वर सलीम आणि अल्पवयीन वधू अनिसा यांचा विवाह रोखण्यात यश आले. या वेळी मुलीचे वय 16 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले.