आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये राबतात बालमजूर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- दोन, पाच, दहा रुपये लहान मुलांच्या हातात ठेवायचे आणि बालमजुरीचा नियम पायदळी तुडवत संपूर्ण पोलिस ठाणे स्वच्छ करून घ्यायचे, असा प्रघातच सध्या देवपूर पोलिसांनी पाडला आहे. त्यामुळे कायद्याचे रक्षकच कायदा मोडून बालमजुरी प्रथेला पाठिंबा देत असल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत आढळले.
बालगुन्हेगारीसोबत बालमजुरीची प्रथा संपवण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालमजुरीचे प्रमाण काहीअंशी घटले आहे. असे असले तरी काहींकडून अजूनही या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसते.

नियमांचा अवमान करणार्‍या अशा महाभागांच्या पंक्तीत जर दस्तुरखुद्द पोलिसच जाऊन बसले असतील तर काय म्हणावे, असा प्रश्न देवपूर पोलिस ठाण्यात अवघ्या काही पैशांसाठी स्वच्छता करणार्‍या गरजू लहान मुलांकडे पाहून कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही ; परंतु कायद्याच्या अंमलबजावणीची बाजू सांभाळणार्‍या पोलिसांना मात्र हा प्रश्न भेडसावत नाही हे विशेष. गेल्या वर्षी नवीन विस्थापितांप्रमाणे एकवीरादेवी मंदिराजवळ स्थलांतरित झालेल्या देवपूर पोलिसांना पांथ निवासाच्या माध्यमातून मोठी जागा मिळाली आहे. अधिक क्षेत्रफळ असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न आलाच ; परंतु स्वच्छतेचे काम कोण करणार ? असा यक्षप्रश्न पडलेल्या देवपूर पोलिसांनी त्यावर नामी शक्कल लढविली आहे. गरजू मुलांना हेरायचे, त्यांच्या हातात दोन पैसे ठेवायचे आणि संपूर्ण पोलिस ठाणे, पायर्‍या व परिसर स्वच्छ करून घ्यायचा, असा प्रघातच येथील पोलिसांनी पाडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कायदा सर्वांनाच सारखा आहे. सर्वसामान्यांप्रमाणे तो पोलिसांनाही लागू पडतो. बालमजुरीचा प्रकार घडला असल्यास सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई केली जाईल. चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी.

मग समिती कशासाठी ?
बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासन व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांची एकत्रित समिती काम पाहते. याशिवाय स्वतंत्र प्रकल्प कार्यालयही आहे. जिल्हा सरकारी कामगार अधिकार्‍यांच्या अखत्यारीत हे कार्यालय चालते. असे असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा मात्र वेगळयाच असताना देवपूर पोलिसांनी त्याला मूठमाती दिली.