आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालमजुरी हा कारवाईचा नव्हे, तर प्रबोधनाचा विषय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात सर्रास सुरू असलेल्या बालमजुरीच्या प्रश्नावर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत. दुसरीकडे सहायक कामगार आयुक्तांना मात्र या प्रश्नावर कारवाईऐवजी प्रबोधन हाच प्रभावी मार्ग वाटत आहे. तसेच कुणा-कुणावर कारवाई करणार? लोकांनीच प्रबोधनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत व्यक्त करत आपल्या विभागाचे काम चोखपणे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शहरातील एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाच्या प्रांगणावर शुक्रवारी गणेश कॉलनीतील राजेश शर्मा यांच्याकडील विवाह सोहळा पार पडला. त्यात शमीर तासा अँण्ड पार्टी व यावल येथील युसूफ बॅण्ड पार्टी, तर गोरज मुहूर्तावरील विवाह सोहळ्यासाठी विद्युत रोषणाईकरिता नशिराबाद येथील साबीरभाई यांचे पथक बोलावण्यात आले होते. त्यात 22 बालमजुरांना राबवण्यात आले होते. याबाबतचे वृत्त 16 फेब्रुवारी रोजी ‘दिव्य मराठी’ने छायाचित्रांसह प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी तत्काळ संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. असे असले तरी, सहायक कामगार आयुक्त यांना या आदेशाबाबत काही एक माहिती नसल्याने ते याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी आपणास अद्याप जिल्हाधिकार्‍यांचा कुठलाही आदेश मिळाला नाही, असे सांगत लग्नसोहळ्याबद्दलही आपणास माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

सहायक कामगार आयुक्त गुलाबराव दाभाडे यांना थेट प्रश्न
विवाहातील बालमजुरांबाबत कारवाई केली का? नाही, माहितीच मिळाली नाही. तसेच जिल्हाधिकार्‍यांचे कोणतेही आदेशही मिळाले नाहीत.
आदेशाशिवाय कारवाई होणार नाही का? तसे नाही; पण हा प्रश्न कारवाईने सुटणार नाही. त्यात प्रबोधनाची गरज आहे. नैतिकता बाळगून लोकांनी बालमजुरीला विरोध केला पाहिजे. माहिती घेऊन मी कारवाई करेन.
तुमचा विभाग काय करतो, किती कारवाया केल्या? हॉटेल्स, लग्न समारंभांवर आमच्या पथकांची नजर असते. आतापर्यंत मी 10 जणांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
या प्रकरणात काय कारवाई करणार? जबाबदार असलेल्या सर्वांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करेन.

नोटीस बजावण्याचे आदेश
बालमजुरी हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे लग्नाचे आयोजक व ठेकेदाराला नोटीस बजावून कारवाई करण्याबाबत सहायक कामगार आयुक्तांना लेखी आदेश काढले आहेत. ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी