आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाइल्डलाइनने रोखला जळगावात बालविवाह, साखरपुडा उरकला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विवाहयोग्य वय नसल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर होणारा मुस्लिम समाजातील विवाह ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे या कुटुंबाची समाजात बदनामी तरच झालीच, पण लग्नासाठी केलेला खर्चही वाया गेला. याचबरोबर बँडबाजा, वर्‍हाडींना परत जावे लागले. महिला व बालविकास मंत्रालयाच्या चाइल्ड हेल्पलाइन इंडिया फाउंडेशनच्या पुढाकाराने हा प्रकार टळला.

रविवारी तांबापुरा येथे वर सलीम आणि वधू अनिसा यांचा विवाह होणार होता. सलीम भिवंडी येथे वैद्यकीय अधिकारी असून मुलगी 12 वी सायन्सला शिकते आहे. तिचे वय 18 पेक्षा कमी (16 वर्षे) असल्याचे समजताच जळगावातील अमर चाइल्ड हेल्पलाइनच्या टीमने वधू-वर पक्षांना एकत्रित बोलावून बालविवाह रोखण्याची विनंती केली. पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला व मुलांकरिता साहाय्य कक्षात वधूवरांसह त्यांच्या आईवडिलांकडून लेखी स्वरूपात जबाब घेतले.

त्यामुळे मुलामुलीसह कुटुंबातील सदस्यांना वस्तुस्थिती मान्य करावी लागली. लग्न रद्द करावे लागल्यामुळे केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून त्याच ठिकाणी लग्नाऐवजी साखरपुडा करून घेतला. मुलीचे वडील लष्करात असल्यामुळे त्यांना सुटी मिळत नाही. मुलीचे लग्न लवकर करावे या हेतूनेच हा सोहळा ठरवण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले. चाईल्ड लाईने आत्तापर्यंत आठ अल्पवयीन मुलींचे लग्न रोखले आहेत. महिला व बालविकास मंत्रालयाच्या 1098 या क्रमांकावर तक्रारी नोंदवल्या जातात.