आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात प्रचार रॅलीसाठी होतो बालकांचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरासह सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून प्रचारार्थ विविध भागात रॅली काढण्यात येत आहे. रॅलीत गर्दी दिसावी यासाठी अनेकांकडून माणसे गोळा करण्यात येतात; परंतु काही उमेदवारांकडून रॅलीत बालकांचा सर्रास वापर केला जात असल्याचे चित्र दिसून आले.

शहरात मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याने उमेदवारांना कार्यकर्ते, प्रचार करणाऱ्यांची कमतरता भासत आहेत. ठेकेदारी पद्धतीने माणसे उपलब्ध करून देणाऱ्यांनाही प्रत्येक रॅलीसाठी शंभर ते दोनशे लोक उपलब्ध करून देणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत प्रचारासाठी असलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध फंडे वापरले जात आहेत. त्यात पारंपरिक पद्धतीने हातगाडी, रिक्षांवर फलक, भोंगे लावून उमेदवारांचा प्रचार करणे, प्रमुख चौकात प्रचारार्थ फलक लावणे, झेंडे वाटप, चिन्हांच्या प्रतिकृतीचा आदी प्रकार होत आहेत. तरी प्रचार रॅलीद्वारे होणारी वातावरण निर्मिती आणि शक्तिप्रदर्शनाचे ते प्रभावी माध्यम असल्याने अनेकांकडून रॅली काढण्यावर भर दिला जात आहे.
त्यादृष्टीने एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराकडून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने लहान मुले सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यात काही मुले हे स्वत:ही सहभागी झाली होती. असे असले तरी निवडणूक आयोग या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहे.
श्रमिक वस्तीत अधिक प्रमाण
शहरात श्रमिक, अल्पसंख्याक आणि कष्टकरी वस्तीत रॅलीत सहभागी होणाऱ्या लहान मुलांची संख्या अधिक असते. अनेकदा उमेदवारांकडून वाटण्यात येणारे पक्षाचे बिल्ले, ध्वज, टोपी इतर साहित्य मिळविण्यासाठी हे मुले रॅलीत सहभागी होत असतात.