आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात झाली बुलेट ट्रेनची नांदी,पर्यटकांची मात्र अद्यापही कोळसा इंजिनलाच पसंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- बुलेट ट्रेन, मेट्रोपर्यंतचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय रेल्वेत काळानुसार अाधुनिकतेची भर पडत आहे. असे असले तरी ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे वाफेवर चालणाऱ्या इंजिनची क्रेझ कमी झालेली नाही. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी २५ इंजिन अजूनही ‘झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी’ या गीताची आठवण करून देत वेगवेगळ्या मार्गांवर धावताना दिसतात. यात आता भुसावळमधील तीन इंजिनची भर पडेल. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार लोको शेड व झेडटीएसमध्ये ठेवलेले तीनपैकी एक इंजिन शुक्रवारी रात्री दिल्लीकडे रवाना झाले.    देशातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मागणीनुसार जुन्या वाफेच्या इंजिनांचा वापर हळूहळू वाढवला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील बंद असलेले कोळशाचे इंजिन दिल्लीत एकत्र आणून त्यांची दुरुस्ती सुरू आहे. कार्यान्वित झाल्यानंतर ही इंजिन वेगवेगळ्या पर्यटनस्थळी असलेल्या रेल्वेमार्गांवर चालवली जातील. यात लवकरच भुसावळातील तीन इंजिनांचा समावेश होईल. या कामासाठी दिल्ली येथील रेल्वे अभियंता गणपत व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक गेला आठवडाभर भुसावळमध्ये मुक्कामी होते. त्यांनी लोको शेडमधील एका जुन्या इंजिनाला ऑइलिंग, ग्रिसिंग केले. शुक्रवारी रात्री हे इंजिन (नं.७०००) दिल्लीकडे रवाना झाले. एका स्वतंत्र इंजिनला टोइंग करून वाफेवरील हे इंजिन १९९२ नंतर प्रथमच रेल्वेमार्गावर धावले.
 
इतिहास असा 
भुसावळ येथून दिल्लीला पाठवण्यात आलेले इंजिन क्रमांक ७००० हे १९५५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये तयार झाले होते. या इंजिनचे शेवटचे पीअाेएच (देखभाल-दुरुस्ती) १५ डिसेंबर १९८८ मध्ये झाले. हे इंजिन १९९२ मध्ये  लाेकाशेडमध्ये लावण्यात आले. त्यानंतर तब्बल २९ वर्षांनी प्रथमच या इंजिनची चाके शुक्रवारी चालली. इंजिन धावण्यासाठी तयार असल्याचा अहवाल दिल्ली येथून अालेल्या पथकाने डीआरएम आर. के. यादव यांना सादर केला. यानंतर हे इंजिन दिल्लीकडे रवाना करण्यात आले.
 
रेल्वेलाइन टाकावी लागणार  
भुसावळात काेळशावर चालणारी तीन इंजिने आहेत. त्यात लोकोशेडमधील दोन (नं. ७०००) व (नं. ७१७ एफ ), तर झोनल ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील एका इंजिनाचा (डब्ल्यूजी १०२५३) समावेश आहे. झेडटीएसच्या अावारातील इंजिनही दिल्लीला पाठवले जाणार आहे. त्यासाठी झेडटीएसपासून एक किमी अंतराची नवीन रेल्वेलाइन टाकावी लागेल, अशी माहिती पथकाने दिली.
 
देशातील जुन्या इंजिनची संख्या
रेवाडी येथे १०, दार्जिलिंगला ७, उटी येथे ४, तर सिमला, पठाणकाेट, पतियाळा व दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये प्रत्येकी एक जुने इंजिन आहे. यात अाता भुसावळातील तीन इंजिनांची भर पडणार अाहे. काेळशाचे इंजिन ताशी ५० किमी वेगाने धावते.
बातम्या आणखी आहेत...