आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chopadya City Youth Crossed 4500 Km Within 74 KM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपड्यातील तरुणाने केले 4500 किमी अंतर 74 तासांत पार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- देशाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत (लेह ते कन्याकुमारी)चे अंतर मोटारसायकलने सलग तीन दिवस दोन तासात (74 तास) पार करण्याचा नवा विक्रम जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केला आहे. सुमारे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करताना त्याने आधीचा विक्रम 21 तासांनी मागे टाकला. त्याच्या या विक्रमाची ‘लिम्का बुक’ने दखल घेतली.
चोपडा येथील विपिन बोरोले (वय 21) या धाडसी तरुणाला नवनवीन साहस करण्याची आवड आहे. त्यातून त्याचा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न असतो. त्याने संपूर्ण देश मोटारसायकलने पालथा घालण्याचा निर्णय घेतला. जगातील सर्वाधिक उंच (18 हजार 380 फूट) असलेल्या खरदुंगलापास या ठिकाणाहून 19 ऑगस्टला सकाळी 6 वाजता त्याने मोटारसायकलने मोहिमेला सुरुवात केली. 22 ऑगस्टला सकाळी 8 वाजता तो कन्याकुमारीला पोहोचला. विपिनने मोहीम हाती घेण्यापूर्वी आई-वडिलांनाही सांगितले नव्हते. परंतु त्याने आपल्या धाडसाने ही मोहीम यशस्वी करून दाखवली.
असा केला प्रवास
लेह, मनाली, चंदिगड, दिल्ली, आग्रा, झाशी, नागपूर, हैदराबाद, बंगळुरू, मदुराई या मार्गाने देशातील 11 राज्यांतून प्रवास करत त्याने 74 तासांत हे अंतर पार केले. या प्रवासात पेट्रोल भरण्याव्यतिरिक्त तो कुठेही थांबला नाही. तसेच यादरम्यान तो केवळ ज्यूस पिऊन व बिस्किटे खाऊन राहिला.
एव्हरेस्टही केले होते सर
विपिनने यापूर्वी माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. एव्हरेस्ट सर करणारा जगातील सर्वात लहान (वय 17) गिर्यारोहकाचा विक्रम त्याच्या नावावर सन 2009मध्ये नोंदवला गेला आहे. लेह ते कन्याकुमारी मोहिमेच्या तयारीसाठी विपिनने मित्रांसोबत सातपुड्यात ‘माउंटन बाइक’ मोहीम राबवली.
तिघांना मोहीम समर्पित
पुणे येथे डिप्लोमा पूर्ण करून चोपडा येथील पंकज महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रा.नागेश गर्जे व मित्र लेफ्टनंट भूषण भालेराव यांच्यासह ‘लेह ते कन्याकुमारी’ या मोहिमेची आखणी केली होती. नंतर अवघ्या चार महिन्यांत प्रा.गर्जे व भालेराव यांचे अपघातात निधन झाले. तसेच मामा जितेंद्र नारखेडे यांचेही निधन झाले. त्यांना त्याने ही मोहीम समर्पित केली आहे.
अल्टिट्यूट सिकनेसचा त्रास
कुठलाही पूर्वानुभव नसताना पार पाडलेल्या या मोहिमेमुळे विपिनला अल्टिट्यूट सिकनेसचा त्रास झाला. जास्त उंचावर गेल्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. हायपोथर्मिया या आजाराचीही लक्षणे त्याला जाणवली. वातावरणामुळे रक्त गोठून त्वचा काळी पडते.