आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णावर वेळीच उपचार न झाल्याने धुळ्यात डॉक्टरवर चाकूहल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - रुग्णावर वेळीच उपचार झाले नसल्याचा आरोप करीत शहरातील प्रथमेश हॉस्पिटलचे डॉक्टर पराग देवरे यांच्यावर बुधवारी मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात डॉ.देवरे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अद्याप एकाही हल्लेखोरास पोलिसांनी अटक केलेली नाही.


अपघातात जखमी झालेल्या भरत बैरागी यांना प्रथमेश रूग्णालयात आणले होते. डॉक्टर पाटील यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केला. परंतु बैरागीसोबत आलेले संजय राठोड, प्रवीण भोये यांच्यासह सुमारे 10 जणांनी रुग्णालयातील कर्मचा-यांशी वाद घातला. प्रमुख डॉक्टरांना त्वरित बोलवा, अशी मागणी करीत त्यांनी संपूर्ण रुग्णालय डोक्यावर घेतले. तेवढ्यात डॉ. पराग देवरे हे आले. डॉ. देवरे यांच्याशीही वाद घालत त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर चाकूचे वारदेखील करण्यात आले. या घटनेत डॉ. देवरे यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच डॉ. देवरे यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाची सोनसाखळी, 34 हजार रुपये किमतीचा मोबाइल लुटण्यात आला. डॉ. देवरे यांच्या बचावासाठी आलेल्यांना देखील मारहाण करण्यात आली. डॉ. देवरे यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलिस ठाण्यात संजय राठोड, प्रवीण भोये यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जखमी डॉ. देवरे यांच्यावर त्यांच्याच प्रथमेश रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


तीन महिन्यांत तिसरी घटना...
डॉक्टरांवरील हल्ल्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मालेगाव रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या समर्थकांनी धिंगाणा घातला होता. तर मागील महिन्यात साक्री रोडवरील रुग्णालयात हाच कित्ता गिरवण्यात आला होता. विशेष म्हणजे या दोन्ही घटना रुग्णाच्या मृत्यूनंतर घडल्या होत्या. तथापि दोन्ही घटनांमध्ये मारहाण होऊनही डॉक्टरांनी पोलिस दप्तरी तक्रार दिली नव्हती.


वेळेवर केले उपचार
कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याच्यावर लागलीच उपचार केले जातात. बैरागी यांच्यावरही उपचार सुरू होते. अवघ्या सात ते आठ मिनिटांत मी पोहोचलो. तोवर योग्य उपचार झाले होते. रुग्णाच्या नातलगांकडून सहकार्य केले जात असले तरी इतर जण मात्र धिंगाणा घालत होते.
डॉ. पराग देवरे, संचालक, प्रथमेश रुग्णालय