नंदुरबार - चित्रपटातकाम करणे ही बाब अवघड नाही. अभिनेता, अभिनेत्री सुंदर असावे असेही नाही. तर ज्यांच्याकडे कला आहे, ते उत्कृष्ट अभिनेते, अभिनेत्री बनू शकतात. केवळ पंख असून उपयोग नाही तर पंखात उडण्याचे बळ असले पाहिजे, असे मत सिनेअभिनेत्री प्रितम कांगणे यांनी व्यक्त केले.
युवारंग युवक महोत्सवानिमित्त सोमवारी सायंकाळी त्यांची अरविंद चौधरी यांनी प्रगट मुलाखत घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी नाट्य दिग्दर्शक केतनभाई लुंकड, ‘राजे-एक क्रांती’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक शिवा बागुल, सचिन सैंदाणे, युवारंग व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. डॉ. पी. एस. नन्नवरे, जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव, युवारंगचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अरविंद चौधरी, विद्यार्थी परिषदेचे सचिव राहुल गावित आदी उपस्थित होते.
प्रितम कांगणे म्हणाल्या की, मराठी मुलींनी सिनेसृष्टीत यायला हवे. या क्षेत्रात सुरक्षितता आहे. नायिका कधीच एकटी नसते. तिच्या सोबत मेकअप करणारे आर्टिस्ट असतात.
आपल्या पंखांमध्ये बळ असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळतेच. मी दीड महिना चित्रीकरणासाठी थायलंडमध्ये गेले होते. त्या ठिकाणी चांगला अनुभव आला. रसिकांचे कलाकारांवर प्रेम असते. प्रत्येक ठिकाणी कलावंताचा सन्मान होतो. रसिक हे कलावंतांकडे वाईट नजरेने पाहतात हा समज चुकीचा आहे. रसिक नेहमी कलाकारांमधील खुबी शोधत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रितम कांगणे म्हणाल्या की, अनेकदा दिग्दर्शक काय सांगतात ते आम्हाला कळत नाही. मग रिटेक होऊन तो सिन ओके केला जातो. चित्रपटात काम करणे फारसे अवघड नाही ; परंतु लाखात एकच प्रियंका चोप्रा घडू शकते. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. भारतीय सिनेसृष्टी सिनेतारकांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी युवतींनी घाबरू नये. मुलींनीही पालकांचा विश्वास संपादन केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले.
युवारंग युवक महोत्सवात नृत्य करताना सिनेअभिनेत्री प्रितम कांगणे केतन लुंकड.