आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Citizen Beating In The Case Of Took Girl Photos, Molestation Charge Registered

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलमध्ये मुलीचे फोटो काढून धमकावणा-यास चोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वैयक्तिकसंबंध प्रस्थापित करण्यासाठी अल्पवयीन मुलीला त्रास देणा-या अडावद (ता.चोपडा) येथील विशाल सुरेश महाजन याची नागरिकांनी सोमवारी १०.३० वाजता आयटीआय परिसरात चांगलीच धुलाई केली. एवढेच नव्हे त्याला चोप देत नागरिकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधिन केले. विशाल पीडित मुलीला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत होता, तसेच मोबाइलवर फोटो काढून तिला धमकावत होता.

विशाल महाजन हा गेल्या तीन वर्षांपासून तक्रारदार कविताची (नाव बदललेले आहे) अडावद येथे छेड काढत होता. या त्रासाला कंटाळून तसेच कविताचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून तीन महिन्यांपूर्वी कविताचे कुटूंबीय जळगावात आले होते. मात्र, विशालने जळगावातही तिचा पिच्छा सोडला नाही. त्यानेही जळगावात आयटीआयला प्रवेश घेऊन तिची छेड काढणे सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्याने कविताचा मोबाइलमध्ये फोटो काढला होता. या फोटोचा धाक दाखवून तो कविताला दररोज धमकावत होता. त्याच्या या दररोजच्या त्रासाला कंटाळून कविताने महाविद्यालयात जाणेही टाळले होते. एवढेच नव्हे तर महिनाभरापासून या त्रासामुळे तिची मानसिकतादेखील ढासाळली होती. त्यामुळे ती घरात महाविद्यालयात कुणाशीही बोलत नव्हती. तिची ही अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी चर्चा केली. त्या वेळी तिने विशाल जळगावातही त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानुसार संतापलेल्या कुटुंबीयांनी सापळा रचून त्याला सोमवारी आयटीआयजवळ पकडले. या ठिकाणी कुटूंबीयांसह जमावाने विशालची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक यू. आर. गवळी करत आहेत.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दीडमहिन्यांपूर्वी मू. जे. महाविद्यालयात पाच टवाळखोरांनी मुलींची छेड काढली होती. या टवाळखोरांचा महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसताना ते महाविद्यालयात येऊन मुलींची छेड काढत. या घटनेमुळे महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच टवाळखोरांना पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निर्भया पथकाने महाविद्यालयांच्या परिसरावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दीड तास पाळत ठेवून पकडले
सोमवारीसकाळी वाजेपासून कविताच्या कुटुंबीयांनी विशालवर पाळत ठेवली होती. त्याने सकाळी १० वाजता एसएनडीटी महाविद्यालयासमोर कविताचा रस्ता अडवला. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आयटीआयकडे नेले. या ठिकाणी माझ्याकडे तुझे फोटो आहेत. कुणाला सांगितले, तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेल अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार कुटूंबीय पाळत ठेवून पाहत होते. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता आयटीआयसमोरच्या चहाच्या टपरीवरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांसह संतप्त जमावाने त्याची धुलाई केली. तसेच मारतमारत त्याला नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, त्याचा मोबाइलही गहाळ झाला.

इतर मुलींनाही त्रास
विशालहा आयटीआयमधीलही काही मुलींची फसवणूक करीत होता, अशी माहिती जमावातील युवकांनी दिली. अडावद येथेही त्याचे असेच कृत्य सुरू असते. त्यामुळे त्याच्यापासून अनेक मुलींना त्रास होत होता. तक्रारदार मुलीसह तिच्या कुटुंबीयांनी हिंमत दाखवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास मदत केली. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.