आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोदेकरांचे रस्त्यासाठी दोन तास आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोहन टॉकीज ते आसोदा रेल्वेगेटपर्यंतच्या रस्त्याने शनिवारी तिसरा बळी घेतला. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता रेल्वेगेटजवळ रास्ता रोको अांदाेलन केले. तब्बल दोन तास रस्ता बंद राहिल्याने शेकडो वाहनांची रीघ लागून आठ गावांची वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अांदाेलकांची भेट घेऊन समजूत काढली. तसेच येत्या चार दिवसांत काम सुरू करण्याचे अाश्वासन दिले. त्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात अालेे.
रेल्वेगेटजवळील जकात नाक्याजवळ शनिवारी रात्री आसोदा येथील रितेश विलास भोळे या तरुणाचा दुचाकी घसरून मृत्यू झाला होता. या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आसोद्यातील रस्ता दुरुस्ती संयोजन समितीचे पदाधिकारीअाठ गावांतील ग्रामस्थांनी साेमवारी १०.४५ वाजता रास्ता रोको अांदाेलन सुरू केले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची माेठी रांग लागली हाेती. ‘ढिम्म प्रशासन हाय हाय...’, प्रशासन अजून किती बळी घेणार...?’ या घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. रितेशचा मृत्यू झालेल्या ठिकाणावर त्याचा फोटो ठेवून ‘निद्रिस्त प्रशासनाने जागे व्हावे’ असे फलक आंदोलकांनी लावले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यावर आंदोलक ठाम होते. या वेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे हे अांंदाेलनस्थळी दाखल झाले. त्यांनी उपअभियंता नाना बोरसे यांना तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सायंकाळी बुलडोझरने खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले होते. पुढील चार दिवसांत समाधानकारक काम झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. रस्ता दुरुस्ती संयोजन समितीचे किशोर चौधरी, प्रदीप भोळे, रवी देशमुख, महेश भोळे, माजी सरपंच विलास चौधरी, सदस्य अनिल महाजन, संजय भोळे, गोपाळ भोळे, अजय महाजन, खेमचंद महाजन, चंदन चौधरी, तुषार महाजन, डी. के. कोल्हे, डिगंबर चौधरी, पप्पू महाजन यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

काम त्वरित सुरू झाल्यास मी गावात पाय ठेवणार नाही : पाटील
रास्ता रोको आंदोलन सुरू होऊन वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांची संख्या वाढत असताना या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नव्हता. तब्बल तासभराने तालुका शनिपेठ ठाण्यातील काही कर्मचारी अांदाेलनस्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, प्राची राजूरकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

सहकारमंत्री गुलाबराव पाटील, माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी अांदाेलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी एेकूण घेतले नाही. त्यावेळी मंत्री पाटील यांनी हे काम महापालिकेचे अाहे. मात्र, पुढील गावे माझ्या मतदारसंघात असल्याने मी जातीने लक्ष घातले. तसेच येत्या चार दिवसांत काम सुरू झाल्यास मला तुम्ही गावबंदी करा अथवा मी गावात पाय ठेवणार नाही, असा इशारा वजा अाश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...