आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्ती म्हणून नव्हे, तर स्वरक्षणासाठी हेल्मेट वापरण्यास सरसावले नागरिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवीन वर्षापासून दुचाकी वाहनांना हेल्मेट सक्तीचा निर्णय राज्याचे परिवहनमंत्र्यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय या आधीही झाला असला तरी, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नसल्याने हेल्मेट सक्तीचा निर्णय आजवर केवळ कागदावरच राहिला आहे. मात्र, नियमित हेल्मेटचा वापरणाऱ्या वाहनधारकांची संख्या आजही अधिक आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर शनिवारी ‘दिव्य मराठी’च्या चमूने महामार्गावर थांबून हेल्मेट वापरणाऱ्यांचे कौतुक केले.

महामार्गावर केलेल्या पाहणीत तासभरात सुमारे दीड हजारांवर दुचाकी वाहने धावलीत. यात हेल्मेटधारकांचे प्रमाण हे बरेच असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. काही वाहनधारकांनी हेल्मेट जवळ ठेवणे आपणास ओझे वाटत असल्याचे सांगितले. तर अनेकांनी हेल्मेटचा सदुपयोग कसा झाला, अपघातावेळी हेल्मेटमुळे कसे बचावलो, याचे अनुभवही सांगितलेत. आपण किमान महार्गावर तरी हेल्मेटचा वापर करीत असल्याचेही अनेक हेल्मेटधारकांनी सांगितले.

महामार्गावरून वाहने नेताना हेल्मेट, सीटबेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, या नियमबाह्य कृत्यांना आर्थिक दंडाची कारवाईही सूचित केली आहे. हेल्मेट सक्तीचा हा निर्णय दीड वर्षापूर्वीही काढला होता. मात्र, या निर्णयास काही घटकांतून विरोधही झाला होता. आता पुन्हा या निर्णयाला उजळणी देण्यात आली आहे.

सकारात्मक अनुभव
नोकरी निमित्तबाहेर जाणे असल्याने हेल्मेटचा वापर मी नियमित करीत असतो. ज्या दिवशी ते नसेल त्या दिवशी काहीतरी चुकल्यासारखे वाटते. विनोद प्रभाकर बाविस्कर, जळगाव

अपघाताची भीती कायम
नोकरीसाठी नेहमी महामार्गावरून जावे लागते. महामार्गावर अनेक अपघातही पाहिले आहेत. यामुळे भीती कायम असली तरी, सुरक्षिततेचे साधन म्हणून हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मनीष सुरेश बोराळे, जळगाव

कंपनीत बंधनकारक
आमच्या कंपनीत हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. यामुळे मी नियमित हेल्मेटचा वापर करतो. ती आता एक सवयच बनली आहे. शांताराम सुदाम पाटील, जळगाव

सुरक्षा महत्त्वाची
मी नियमितहेल्मेट वापरतो, यामुळे अपघातापासून बचावासह धूळ, प्रदूषणापासून चेहऱ्याचे संरक्षणही होते. विना हेल्मेट कधीही वाहन चालवत नाही. हेल्मेट वापराचे फायदे दूरगामी आहेत. मनोज साळवे, भुसावळ

राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट घालणारे वाहनधारक.
हेल्मेट सक्ती बाबतचे नवीन आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, तपासणी मोहीम सुरू असून कारवाई केली जात आहे. तसेच हेल्मेट वापरण्याविषयी वाहनधारकांना प्रबोधन केले जात आहे. आदेश प्राप्त झाल्यावर विनाहेल्मेट असणाऱ्या वाहनधारकांवर सक्तीची कारवाई केली जाईल. - चंद्रकांत सरोदे, वाहतूक निरीक्षक