आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीन’च्या अाॅफिससमाेरच पाणी; १३५ सफाई कर्मचारी कुचकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरापासून पाच किलाेमीटर अंतरावर स्थलांतरित झालेल्या जिल्हा रुग्णालयाची पुरती दैनावस्था झाली अाहे. रुग्णालयात सुविधांच्या नावाने पुन्हा ओरड होत अाहे. त्यात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. चक्क अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्या कार्यालयाबाहेर पाणी तुंबले अाहे. रुग्णालयाच्या तळघरात, वाहनतळाजवळ जागोजागी घनकचरा साठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जैविक कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लागत नाही. १३५ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, ते सफाईत कुचकामी ठरल्याचे दिसते.
अारोग्यसेवा देणे अधिक सुलभ होईल, यासह अनेक आश्वासने देऊन शहरातील जिल्हा रुग्णालय चक्करबर्डी येथे स्थलांतरित करण्यात आले; परंतु अवघ्या काही दिवसांतच या रुग्णालयातील अस्वच्छता पुन्हा दिसू लागली आहे. अपघात विभागाखाली असलेले तळघर, रुग्णालयाखालून जाणारा पाट यामध्ये कचरा साचलेला दिसून आला. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. रुग्णालयाच्या विविध वॉर्डांबाहेर काहीअंशी स्वच्छता असली तरी रुग्णाच्या मलमपट्टी, इंजेक्शन, औषधी इतर घनकचरा मात्र तळमजल्यावर साठवून ठेवण्यात आला होता.

उघड्यावर मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेला हा घनकचरा रुग्णांच्या आरोग्याला घातक ठरू शकतो, हे माहीत असूनही त्याकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सपशेल डोळेझाक केल्याचे दिसते; परंतु याबाबत केवळ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून चालणार नाही. तर रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेले डॉ. गुप्ता यांच्या दालनासमोर मोठ्या अाकारातील खोल अशा खड्ड्यात घाण पाणी तुंबल्याचे दिसून आले. काळेशार पडलेले पाणी आणि त्यात पसरलेला कचरा पाहून या ठिकाणी स्वच्छता होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. ही बाब डॉ. गुप्ता यांच्याही नजरेस पडली नसेल का, शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेबाबत आदेश होत नसेल का असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतो. एवढेच नव्हे तर रुग्णाचे नातलग पाणी घेण्यासाठी येत असलेल्या नळाखालीही अस्वच्छता होती. तर काही ठिकाणी वॉटर कुलर उघड्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे दूषित पाण्याच्या माध्यमातूनही आजाराची लागण होऊ शकते.

यापुढे कारवाई अटळ
^अस्वच्छते बद्दल यापूर्वीही काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नियमित स्वच्छता करण्याची सूचना केली जाते; परंतु काही दिवस पालन केल्यानंतर या सूचनांकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळेच या प्रश्नांना आता सामोरे जावे लागते आहे; परंतु यानंतरही स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. रुग्णालयाला शिस्त लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. -डॉ.एस. एस. गुप्ता, अधिष्ठाता

१३० सफाई कर्मचारी
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे १३० सफाई कर्मचारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय या ठिकाणी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची वॉर्डनिहाय कामे ठरवून देण्यात आली आहेत. याशिवाय परिसर स्वच्छतेची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. एकूण सफाई कर्मचारी संख्येमध्ये परिसर स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी अाहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने तशी कामाची विभागणी केली जाते, अशी खुलासेवजा माहितीही दिली.

जबाबदारी नागरिकांचीही
रुग्णालय स्वच्छ राखणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे; परंतु याकडे कानाडाेळा होत असल्याचेही दिसून आले. त्यामुळेच कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या रुग्णालयाच्या भिंतीवर पान खाऊन इतस्तत: थुंकल्याचे आढळून आले. शिवाय काही महाभाग नैसर्गिक विधी करण्यासही मागे राहिले नाहीत. तळमजला वाहनतळाजवळील लिफ्ट विविध खोल्यांजवळ यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.

संघटनांचा संपला धाक...
शहरात रुग्णालय असताना विविध संघटनांच्या नजरेखाली कामकाज चालत होते. मात्र, आता शहराबाहेर स्थलांतरित झालेल्या सिव्हिलकडे त्यातील कारभाराकडे कुणी लक्ष देत नाही. पाच किलोमीटर अंतरावर असल्यामुळे संघटनाही अांदोलनासाठी जात नाही. त्यामुळे दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रुग्णालय आहे की कचराकुंडी असा प्रश्न पडावा, इतकी घाण या परिसरात दिसून येते. रुग्णही यामुळे वैतागत असल्याचे दिसते.
बातम्या आणखी आहेत...