आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Sanitation Contract For 350 Workers Appointment

शहर स्वच्छतेसाठी ३५० कंत्राटी कामगार नेमणार, कर्मचाऱ्यांचे मस्टर तपासले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील स्वच्छतेबाबत शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत मनपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर आज सदस्यांसह विविध भागांत फिरून सभापती नितीन बरडे यांनी सफाई कामगारांच्या हजेरीचा आढावा घेतला.
या वेळी अनेक कर्मचारी रजेवर असल्याचे पाहून त्यांनी यापुढे वैद्यकीय प्रमाणपत्र खातरजमा केल्याशिवाय रजा देऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, ३५० कंत्राटी सफाई कामगार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सभापतींनी सांगितले.
शहरातील स्वच्छतेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्यांना चांगलाच दम भरल्यानंतर स्थायीचे सभापती नितीन बरडे यांनी शनिवारी समिती सदस्यांसह विविध भागात फिरून सफाई कामगारांच्या हजेरीचा आढावा घेतला. या वेळी समिती सदस्य चेतन सनकत, बंटी जोशी, अश्विन सोनवणे यांनी मेहरूण, बसस्थानक परिसर, बालगंधर्व नाट्यगृह परिसर यासह विविध भागात फिरून कार्यरत असलेल्या सफाई कामगारांसह मुकादम यांचे हजेरी मस्टर तपासले. यात अनेक कामगार वैद्यकीयसह विविध हक्काच्या रजेवर असल्याने गैरहजर असल्याचे आढळून अाले. त्यामुळे यापुढे वैद्यकीय प्रमाणपत्र खातरजमा केल्याशिवाय सफाई कामगारांना रजा देऊ नये, अशा सक्त सूचनाही सभापतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तर गैरहजेरीत वाहनचालकांचाही समावेश होता. त्यामुळे अनेक घंटागाड्याही फिरू शकल्या नाहीत. मुकादम यांनी दुपारपर्यंत दिलेल्या वॉर्डात थांबून आपल्या कामाचा आढावा सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.

सफाई कामगारांना रजा कुणाच्या संमतीने दिल्या आहेत? याची पडताळणीही सायंकाळी सभापतींनी केली. रजेसाठी खातेप्रमुखांच्या शिफारशी ग्राह्य धरता, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्यावरच त्यांची रजा ग्राह्य धरावी, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांना कार्यालयात बोलावून दिल्या. दरम्यान, शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली नसली तरी अनेक भागांत कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याने जमा केलेल्या कचऱ्याचे ढीग विविध भागात दिसून आले. शहरात स्वच्छतेचे काम नियमित सुरू ठेवणार असून यासाठी घंटागाडी, डंपरची संख्याही वाढवली जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामाची सक्ती करून ३५० कंत्राटी सफाई कर्मचारी नियुक्त करून हे काम कायम सुरू ठेवले जाणार आहे. यासंबंधी प्रत्येक आठवड्याला बैठक घेणार असल्याचे सभापतींनी सांगितले.