जळगाव - जिल्हा रुग्णालयातील स्लॅबचे प्लास्टर कोसळून बालिका दगावल्याची घटना ताजी असतानाच मनपाच्या चेतनदास मेहता रुग्णालयाची इमारतही धोकादायक बनली आहे. दरवर्षी या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित होऊनही प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याची स्थिती आहे. तातडीने या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते.
सिंधी कॉलनीलगत पालिकेचे चेतनदास मेहता रुग्णालय व प्रसूतिगृह आहे. या इमारतीत बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सुविधा आहेत. मेहरूण, तांबापुरा व सिंधी कॉलनीसह शहरातील इतर भागातूनही या ठिकाणी महिला प्रसूतीसाठी येतात. या रुग्णालयाच्या जिन्याचे प्लास्टर पडलेले असून, आतील आसार्या दिसत आहेत. तसेच जिन्याला लावण्यात आलेल्या सिमेंट जाळ्याही मोडकळीस आल्या असून, रुग्णालयातील ड्रेनेजचे पाइपदेखील फुटलेले आहेत. आॅपरेशन थिएटरलगतच्या भिंतींना लावलेल्या रंगाचे आणि प्लास्टरचे पोपडे निघालेले आहेत. गच्ची तर इतकी कमकुवत झाली आहे की, तिच्यावर वॉटरप्रूफिंगचे काम करणेही धोकादायक आहे. एखाद्या रुग्णास सुविधा न मिळाल्यास नगरसेवक सभागृहात या प्रश्नाकडे लक्ष वेधतात. मात्र, रुग्णांना आवश्यक सुविधा नसल्याबाबत पदाधिकारी काही बोलत नसल्याची स्थिती आहे.
इमारतीचे 44 वर्षांत एकदाच नूतनीकरण
16 आॅगस्ट 1970 साली चेतनदास मेहता रुग्णालयाची उभारणी झाली होती. या ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाना चालवला जात होता. त्यानंतर 7 जुलै 2004 रोजी रुग्णालयाची दुरुस्ती करून रुग्णालय आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात आले होते. मात्र, आधीच जुने बांधकाम असल्याने 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेली डागडुजी निरुपयोगी ठरत आहे.