आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज गूल; सिव्हिलमध्ये रुग्णाचा मृत्यू, पावसाने तारांबळ; शहर पाच तास अंधारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पावसामुळे आयसीयूतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आयसीयूतील जनरेटर सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
प्रकाश भील (४०) असे या रुग्णाचे नाव असून, अॅनिमिया झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री शहरात अचानक वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर रुग्णालयातील वीज काही वेळ खंडित झाली. त्या वेळी प्रकाश भील यांचा मृत्यू झाला. वीजपुरवठ्याअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेला रुग्णालयाचा इलेक्ट्रीशियन वेळत हजर झाला नाही. त्यामुळे जनरेटर सुरू होण्यास उशीर झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या रुग्णाची तब्येत वीजपुुरवठा खंडित होण्याआधीच खालावली होती. वादळी वारा असल्याने वीजपुरवठ्यास थोडा उशीर झाला. यादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी सांगितले.

वादळ पावसाने शहरातील सर्वच फीडरवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. दीपनगर वीज केंद्रातून होणारा वीजपुरवठाच खंडित झाल्याने शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रभर वीज गायब होती. शहरातील महाबळसह, शिरसोली फीडरवरील दुरुस्तीच्या कारणामुळे मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा बंद होता, असे असतानाही रात्री पुन्हा वीज गायब झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागाशिवाय महाबळ, विठ्ठलपेठसह हरिविठ्ठलनगर फीडर ट्रिप झाल्याने पुरवठा खंडित झाला हाेता. पाऊस कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरू होईल, असे क्रॉम्प्टनच्या अभियंत्यांनी सांगितले. मात्र, रात्री एकवाजेपर्यंत शहरातील संपूर्ण भागात वीज गायब होती. दरम्यान, शहरासह आसोदा, भादली, ममुराबाद, नशिराबाद यासह संपूर्ण तालुक्यातही रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंदच होता. त्यामुळे नागरिक संतापले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले. त्यानंतर ८.३० वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. तब्बल दीड तास चाललेल्या पावसाने शहरातील रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. दिवसभर पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नसताना रात्री अचानक वातावरण बदलले होते.

शहरातील विठ्ठलपेठ भागात घराची पडझड झाली. रेल्वे स्टेशनवरील तिकीट घरातील छताचे सिलिंगही कोसळल्याची घटनाही घडली. बसस्थानकातून रात्री सुटणाऱ्या बसेसही थांबवण्यात आल्या होत्या. पावसाचा जोर कमी होताच बसेस मार्गस्थ झाल्याचे आगारच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जोरदार पावसाने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती.